हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२६च्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय पासपोर्टची जागतिक स्थिती सुधारली असून भारत आता ऐंशीव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी भारत पंच्याऐंशीव्या क्रमांकावर होता. यंदा भारताने पाच क्रमांकांची झेप घेतली असून, भारतीय नागरिकांना आता पंचावन्न देशांमध्ये व्हिसा-फ्री, व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा ई-ट्रॅव्हल ऑथरायझेशनच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे.
हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या प्रवासविषयक आकडेवारीवर आधारित असून, जगभरातील जवळपास एकशे नव्याण्णव देशांच्या पासपोर्टची तुलना यात केली जाते. भारताची क्रमवारी सुधारण्यामागे विविध देशांशी वाढलेले द्विपक्षीय संबंध, परराष्ट्र धोरणातील सक्रियता आणि भारतीय नागरिकांचा आंतरराष्ट्रीय प्रवास वाढल्याचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आशिया, आफ्रिका आणि कॅरिबियनमधील अनेक देश भारतीय नागरिकांना सुलभ व्हिसा सुविधा देत आहेत.
हे ही वाचा:
तामिळनाडूत डीएमके नव्हे सीएमसी सरकार!
कठुआमध्ये जैशचा कुख्यात आतंकवादी मोहम्मद उस्मान ठार
बदलापूरातील नराधमाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कोरोना विषाणूची सुरुवात वुहानमधूनच
मात्र, काही देशांनी आपल्या व्हिसा धोरणात बदल केल्यामुळे भारतीय नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसा-फ्री देशांची एकूण संख्या मर्यादित राहिली आहे. तरीही जागतिक क्रमवारीत झालेली ही सुधारणा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. पर्यटन, शिक्षण, व्यापार आणि रोजगाराच्या दृष्टीने याचा थेट फायदा भारतीय प्रवाशांना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या यादीत सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली ठरला असून त्या देशाच्या नागरिकांना एकशे नव्वदपेक्षा अधिक देशांत व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो. भारतासमोर अजूनही मोठा पल्ला गाठायचा असला, तरी भारतीय पासपोर्टची सुधारलेली क्रमवारी भविष्यासाठी सकारात्मक आणि आशादायक संकेत देणारी आहे.







