जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कुख्यात आतंकवादी मोहम्मद उस्मान याला एनकाऊंटरमध्ये ठार केले आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला असून सीमावर्ती भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कठुआमधील भिलावर जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत सुरक्षा यंत्रणांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी सुरक्षा दलांना पाहताच आतंकवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत मोहम्मद उस्मान ठार झाला.
हे ही वाचा:
भारताच्या विदेशी चलन साठ्यात मोठी झेप
कोरोना विषाणूची सुरुवात वुहानमधूनच
२.३५ कोटींचे बक्षीस असलेल्या अनलसह २१ नक्षलवाद्यांना धाडले यमसदनी
खलिस्तान समर्थक दहशतवादी पन्नूविरुद्ध दिल्लीत एफआयआर
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ठार झालेला उस्मान हा पाकिस्तानचा नागरिक होता आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी सक्रियपणे जोडलेला होता. तो जम्मू विभागात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
या एनकाऊंटरनंतरही ऑपरेशन थांबवण्यात आलेले नाही. कारण अजून दोन दहशतवादी परिसरात लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण भागात नाकाबंदी करण्यात आली असून जंगलात सघन शोधमोहीम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, दहशतवाद्यांविरोधात “झिरो टॉलरन्स” धोरण कायम राहणार असून, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.







