एकीकडे राज ठाकरेंनी महाकुंभची खिल्ली उडवलेली असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या दौऱ्यात तेथील राष्ट्राध्यक्षांना गंगेचे जल भेट दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान, राष्ट्राध्यक्ष धरम गोखूल आणि त्यांच्या पत्नीला खास भेटवस्तू दिल्या. पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्षांना महाकुंभाचं पवित्र गंगाजल आणि त्यांच्या पत्नीला पारंपरिक बनारसी साडी भेट दिली. तसंच, त्यांनी बिहारचा सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ ‘मखाना’ देखील दिलं.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला भेट दिलेली बनारसी साडी ही सौंदर्य, परंपरेचा अनोखा मिलाफ आहे.
- ही साडी निळ्या रंगाची असून चांदीच्या जरीच्या नक्षीकामानं सजलेली आहे.
- तिचा पदर भव्य आणि आकर्षक आहे, जो शुभ विवाह, सण आणि समारंभांसाठी परिपूर्ण मानला जातो.
- यासोबत, गुजरातमधील एक खास ‘सादेली बॉक्स’ देखील भेट देण्यात आला. हा किमती साड्या, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
महाकुंभाचं पवित्र गंगाजल आणि बिहारचं मखाना
पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष गोखूल यांना कांस्य आणि पितळच्या भांड्यात महाकुंभाचं पवित्र गंगाजल दिलं, जे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. त्याशिवाय, बिहारचं सुप्रसिद्ध सुपरफूड ‘मखाना’ देखील भेट दिलं.
सर शिवसागर रामगुलाम बॉटनिकल गार्डनमध्ये ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमाअंतर्गत मोदींनी झाड लावलं.
त्यांनी सोशल मीडिया (X) वर फोटो शेअर करत लिहिलं, “प्रकृती, मातृत्व आणि टिकाऊ विकासाला श्रद्धांजली.
पंतप्रधान डॉ. नवीन रामगुलाम यांनी केलेल्या या प्रेरणादायी कार्याने मी भारावून गेलो आहे.
त्यांचा हा पाठिंबा हिरव्या आणि चांगल्या भविष्यासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतीक आहे.”
मंगळवारी पीएम मोदींनी सर शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यानात सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलामही त्यांच्यासोबत उपस्थित होते. ते म्हणाले की, “मॉरिशसच्या प्रगतीसाठी आणि भारत-मॉरिशस संबंध मजबूत करण्यासाठी या नेत्यांची भूमिका अविस्मरणीय आहे.”
पीएम मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर मंगळवारी पोर्ट लुईसला पोहोचले. त्यांचे सर शिवसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी त्यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं.
