यूएईने (संयुक्त अरब अमिरात) इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतात अचानक भेट घेतल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय झाल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद विमानतळाच्या व्यवस्थापन व संचालनासाठी आउटसोर्सिंग प्रक्रियेत यूएईने सुरुवातीला रस दाखवला होता. मात्र, त्यांनी कोणताही स्थानिक भागीदार (लोकल पार्टनर) सुचवला नाही आणि नंतर या प्रक्रियेत पुढे रस नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानला ही योजना थांबवावी लागली.
ही घटना अशा काळात घडली आहे जेव्हा पाकिस्तान सऊदी अरेबियासोबत संरक्षण सहकार्य वाढवत आहे. तर यूएई भारतासोबत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करत आहे. यूएई आणि पाकिस्तान यांचे ऐतिहासिकदृष्ट्या व्यापारी, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात चांगले संबंध होते. मात्र पाकिस्तानमधील सुरक्षा समस्या, परवाना (लायसेंसिंग) वाद, जुनी आणि कमकुवत पायाभूत सुविधा, सरकारी उद्योगांतील तोटा व राजकीय हस्तक्षेप या कारणांमुळे यूएईचा पाकिस्तानवरील विश्वास कमी होत असल्याचे या निर्णयातून दिसते.
हे ही वाचा:
कोलकात्याच्या नाजिराबादमधील गोदामाला भीषण आग
प्रजासत्ताक दिनाआधी राजस्थानात सापडले १० हजार किलो अमोनियम नायट्रेट
याउलट, यूएई राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीनंतर ९०० भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली. भारत-यूएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात आला
एकूणच, या घडामोडीतून यूएईचा भारताकडे वाढता कल आणि पाकिस्तानबाबत वाढती सावध भूमिका स्पष्टपणे दिसून येते.
