इंडोनेशियातील उद्योगपतीला एका दिवसात ९ अब्ज डॉलरचा फटका

उद्योगपती प्राजोगो पंगेस्टू यांच्या संपत्तीत मोठी घसरण

इंडोनेशियातील उद्योगपतीला एका दिवसात ९ अब्ज डॉलरचा फटका

इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती प्राजोगो पंगेस्टू यांच्या संपत्तीत एका दिवसात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे प्राजोगो पंगेस्टू यांना तब्बल ९ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ७४ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या घसरणीमुळे जागतिक उद्योगविश्वातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

प्राजोगो पंगेस्टू यांची संपत्ती मुख्यतः ऊर्जा, पेट्रोकेमिकल आणि खाण उद्योगावर आधारित आहे. ते बारिटो पॅसिफिक या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या कंपनीत सुमारे ७१ टक्के हिस्सेदारी ठेवतात. तसेच पेट्रिंडो जया क्रेआसी या कोळसा आणि खाण व्यवसायाशी संबंधित कंपनीत त्यांची सुमारे ८४ टक्के हिस्सेदारी आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये एका दिवसात १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याच कारणामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत एवढी मोठी घट नोंदवली गेली.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा बूस्टर

चांदीने गाठला ४ लाखांचा टप्पा!

अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित दादा अनंतात विलीन

उत्तराखंड: महिलेला लिफ्ट देऊन चालत्या गाडीत बलात्कार; दोघांना अटक

या घसरणीमागचे मुख्य कारण म्हणजे जागतिक निर्देशांक प्रदाता एमएससीआय (मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल) यांचा एक अहवाल. या अहवालात इंडोनेशियातील काही कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग रचनेबाबत आणि अहवाल सादरीकरणाच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यामुळे परकीय गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री सुरू झाली.

या विक्रीमुळे इंडोनेशियाचा प्रमुख शेअर बाजार निर्देशांक जकार्ता कंपोझिट इंडेक्स देखील जोरदार कोसळला. एका दिवसात हा निर्देशांक सुमारे ७ टक्क्यांनी खाली आला, तर पुढील सत्रात घसरण १० टक्क्यांपर्यंत पोहोचली. बाजारातील या अस्थिरतेचा परिणाम केवळ प्राजोगो पंगेस्टू यांच्यावरच नाही, तर इतर अनेक मोठ्या उद्योगपतींवरही झाला आहे.

या घडामोडीनंतर प्राजोगो पंगेस्टू यांची एकूण संपत्ती सुमारे ३१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहिली आहे. चालू वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत एकूण १५ अब्ज डॉलरहून अधिक घट झाली असल्याचेही सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, जर इंडोनेशियन प्रशासनाने नियमन आणि पारदर्शकतेबाबत लवकर पावले उचलली, तर बाजारातील विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो. अन्यथा, परकीय गुंतवणूकदारांचा ओढा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version