अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणात बदल करत असून ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एच १ बी व्हिसासाठी नव्या अटी घालण्यात आल्या आहेत. यापुढे एच-१ बी व्हिसा प्राप्त करण्यासाठी कंपन्यांना प्रतीवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ओव्हल कार्यालयात डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, या निर्णयामुळे अमेरिकेतील कंपन्या आता उच्च कौशल्य असलेले उमेदवार आणि जे अमेरिकन कामगारांची जागा घेणार नाहीत, अशाच लोकांना या व्हिसाद्वारे अमेरिकेत आणू शकतील. कंपन्यांना कामगार हवेत आणि आम्हाला कुशल कामगार. नव्या बदलांमुळे अमेरिकेला कुशल मनुष्यबळ मिळेल, असं ट्रम्प म्हणाले.
एच- १ बी व्हिसाच्या दरात वाढ जाहीर करताना अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, कंपन्यांना आता प्रत्येक व्हिसासाठी दरवर्षी १,००,००० डॉलर्स द्यावे लागतील. “एच- १ बी व्हिसासाठी दरवर्षी एक लाख डॉलर्स मोजावे लागणार असून यासाठी सर्व मोठ्या कंपन्या सहमत आहेत. आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत,” असे लुटनिक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की या धोरणाचा उद्देश अमेरिकन पदवीधरांना प्राधान्य देणे आहे. जर तुम्ही एखाद्याला प्रशिक्षण देणार असाल तर एखाद्या उत्तम विद्यापीठातून पदवीधरांपैकी एकाला प्रशिक्षण द्या. अमेरिकन लोकांना प्रशिक्षण द्या. आमच्या नोकऱ्या हिरावून घेण्यासाठी लोकांना आणणे थांबवा. ट्रम्प म्हणाले, तंत्रज्ञान क्षेत्र या बदलाचे समर्थन करेल आणि ते नवीन व्हिसा शुल्कामुळे खूप आनंदी होतील.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूरनंतर पीओके वाटतोय असुरक्षित! पाकच्या ‘या’ भागात उभारतायत दहशतवादी तळ
उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती
राहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!
‘नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं’
१९९० मध्ये स्थापन झाल्यापासून अत्यंत कुशल परदेशी कामगारांसाठीच्या कार्यक्रमात ही घोषणा सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. सध्या, एच- १ बी अर्जदारांना लॉटरीमध्ये प्रवेश करण्यासाठी माफक शुल्क द्यावे लागते आणि निवड झाल्यास, हजारो डॉलर्सचे अतिरिक्त शुल्क भरावे लागते. बहुतेक प्रकरणांमध्ये, कंपन्या या व्हिसाचा खर्च भागवतात. हजारो भारतीय या व्हिसाद्वारे अमेरिकेत प्रवेश करतात. अमेरिकेतील कंपन्याद्वारे मुख्यत्वे हा व्हिसा दिला जातो. अमेरिकेतील आयटी कंपन्यांकडून याचा जास्त वापर होतो. अमेरिका दरवर्षी लॉटरी पद्धतीने ८५,००० एच-१ बी व्हिसा जारी करते. या वर्षी, अमेझॉनला सर्वाधिक १०,००० हून अधिक मंजुरी मिळाल्या, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी, मायक्रोसॉफ्ट, ऍपल आणि गुगलचा क्रमांक लागतो.
