अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग १)

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग १)

२०२० मध्ये अझरबैजान आणि अर्मेनिया ह्या दोन सोविएत महासंघातून वेगळ्या झालेल्या देशांमध्ये नगोर्नो-काराबाख ह्या प्रांतात संघर्षाला सुरवात झाली आणि पुन्हा एकदा समाजवादी व्यवस्थेमधील त्रुटींवर आंतरराष्ट्रीय विचारवंतांमध्ये चर्चा रंगू लागली. २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून दुर्लक्षित असलेल्या ह्या प्रश्नाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. अर्मेनिया आणि अझरबैजान हे दोन्ही देश नगोर्नो-काराबाख ह्या प्रदेशावर आपलाच हक्क आहे आणि त्या संबंधीचे ऐतिहासिक पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा वेळोवेळी करत आले आहेत. हा ऐतिहासिक गोंधळ नगोर्नो-काराबाख ह्या नावातूनच दिसून येतो. ‘नगोर्नो’ हा शब्द रशियन भाषेतून आलेला त्याचा अर्थ होतो ‘खडकाळ पर्वत’ तर, ‘कारा’ म्हणजेच काळा रंग हा शब्द तुर्किश भाषेची देण. त्याचबरोबर ‘बाख’ हा शब्द पर्शियन भाषेचा रशियन अपभ्रंश ज्याचा अर्थ म्हणजे ‘बाग’. ह्या ऐतिहासिक गुंतागुंतीमुळे अर्मेनिया येथील आर्तसाख आणि अझरबैजान येथील दागलीक आणि काराबाग प्रदेशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर योग्य तोडगा काढणे कठीण जात आहे.

अठराव्या शतकात हा भाग रशियन झार, तुर्की साम्राज्य आणि पर्शिया ह्यांच्यातील शक्ती संघर्षाचे मुख्य केंद्र होता. १७३५ मध्ये पर्शियन शासक नादीर शाह ह्यांनी नगोर्नो-काराबाख हा प्रदेश तुर्की साम्राज्याकडून जिंकून घेतला. नादीर शाह ह्यांच्या मृत्यूनंतर हा प्रदेशाचे तुकडे करून खानाती निर्माण करण्यात आल्या. विविध संस्कृतींचे घर असलेली काराबाख खानातीवर तुर्कीच्या शासकांचे वर्चस्व होते. रशिया आणि पर्शिया ह्यांच्यात १८०४-१८१३ मध्ये झालेल्या युद्धानंतर १८१३ ला  गुलिस्तान करार करण्यात आला. ह्या करारानुसार इराणचे राजे फत-अली शाह कजार ह्यांनी काराबाख खानातीचे हक्क रशियन झार अलेक्सान्डर-I ह्याच्याकडे  सोपवले. त्याचबरोबर पूर्वीपासून वादग्रस्त असलेला जॉर्जियाचा काही भाग त्याचबरोबर इराणचा दागेस्तान हा प्रदेशसुद्धा रशियाकडे सोपवला. ह्यातील बराचसा भाग आजच्या अझरबैजान आणि अर्मेनिया ह्यांच्यातील संघर्षाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

१८२२ मध्ये हा प्रदेशात रशियाने लष्करी तळ उभारला. लष्करी तळ उभारून ४ वर्ष होत नाहीत तोच पुन्हा एकदा रशियन झार आणि पर्शियन कजार ह्यांच्यात युद्धाची ठिणगी पडली. १८२६-१८२८ दरम्यान झालेल्या युद्धाची सांगता हि तुर्कमेनचे कराराने झाली. ह्या करारानुसार रशियाला दक्षिण कॉकेशस प्रदेशातील एरिव्हान, नाखचिवान आणि तालीश खानातींचा काही भाग इराणकडून देण्यात आला. अरस नदीची सीमा ठरवण्यात आली. अरस नदीच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे सध्याचा जॉर्जिया, अझरबैजान आणि अर्मेनिया देशांचा प्रदेश हा रशियाच्या नियंत्रणात आला तर, नदीच्या उत्तरेकडचा भाग म्हणजेच आताचा दक्षिण-पश्चिमेकडील रशियाचा भाग इराणच्या ताब्यात देण्यात आला.

रशियाने ह्या भागात लोकसांख्यिक बदल करण्यास सुरवात केली. अनेक अझरबैजानी आणि मुस्लिम गटांचे स्थलांतर पर्शिया आणि तुर्की साम्राज्यात झाले. तर अनेक अर्मेनियन लोक बाजूच्या इस्लामिक साम्राज्यांमधून काराबाख येथे पुन्हा येऊ लागले. १८२३ मध्ये काराबाख येथे असलेली ९% अर्मेनियन जनसंख्या १८८० पर्यंत ५३% जाऊन पोहोचली. अनेक पिढ्यांपासून अर्मेनियन आणि अझरबैजानी लोकांमध्ये कमालीचा तणाव होता पण त्याचा खरा स्फोट १९०५ साली पहिली रशियन क्रांती कॉकेशस येथे पोहचल्यावर झाला. बाकू, येरेवान आणि नाखचिवानमध्ये संघर्ष सुरु झाला.

डिसेंबर १९२० मध्ये सोविएत अझरबैजानने एक घोषणा पत्रक जारी केले, त्यानुसार काराबाख, झाँगूर आणि नाखचिवानचा प्रदेश अर्मेनियाला देण्यात यावा असे सांगितले. परंतु तुर्कीचे अध्यक्ष केमाल अतातुर्क ह्यांच्यासोबत शांतता प्रस्थापित करताना सोविएत नेत्यांनी नाखचिवानचा आणि काराबाखचा प्रदेश पुन्हा अझरबैजानकडे सोपवला. कॉकेशस ब्युरो ऑफ कम्युनिस्ट पार्टीने स्टालिनच्या नेतृत्वाखाली १९२१ ला मतदान करून काराबाख अर्मेनिया ला देण्यात यावा असा निर्णय घेतला. परंतु दुसऱ्याच दिवशी हा निर्णय बदलून काराबाखला अझरबैजानी एसएसआरमध्ये स्वायत्तता देण्यात आली.

७ जुलै १९२३ रोजी, अझरबैजानच्या अंतर्गत नगोर्नो-काराबाख ऑटोनॉमस ओब्लास्टची स्थापना झाली. राजधानीचे शहर खानकेंदीचे नाव बदलून अर्मेनियन बोल्शेव्हिक नेते स्टीफन शामियन ह्यांच्या नावावरून ‘स्टेपनकार्ट’ ठेवण्यात आले. आणि म्हणूनच काहीसं नाराज होऊनच, रशियाचा सहयोगी असून देखील अर्मेनियाने तुर्कीसोबत संबंध दृढ करण्यास सुरवात केली. पहिल्या महायुद्धांनंतर स्वतंत्र दक्षिण कॉकेशस प्रजासत्ताकांना पॅरिस शांतता करारादरम्यान आपल्यात असलेले भौगोलिक वाद सोडवले जावेत असे वाटत होते. अर्मेनियाने काराबाख, झाँगूर आणि नाखचिवानयेथे आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले तर तुर्कीत सत्तेवर आलेल्या ब्रिटिशांनी अझरबैजानी प्रशासनाला मदत करायला सुरवात केली.

(क्रमशः)

Exit mobile version