भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या दौऱ्यादरम्यान त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग रिपब्लिक इंडोनेशिया आदिपूर्णा’ (Bintang Republik Indonesia Adipurna) प्रदान करण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी जकार्ता येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात मोदी यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला. भारत- इंडोनेशिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे इंडोनेशियाने स्पष्ट केले आहे.
१९५९ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘बिंतांग रिपब्लिक इंडोनेशिया आदिपूर्णा’ हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान मानला जातो. देशाची एकता, अखंडता, समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढविण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा सन्मान अत्यंत मोजक्या देशप्रमुखांना आणि जागतिक नेत्यांना दिला जातो.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान स्वतःचा नसून १४० कोटी भारतीयांचा असल्याचे सांगितले. “हा सन्मान भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील शतकानुशतके जुडलेल्या मैत्रीचा आणि परस्पर विश्वासाचा गौरव आहे. राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी राष्ट्रपती भवन इस्ताना मर्देका येथे पंतप्रधान मोदी यांचे भव्य औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.
हे ही वाचा:
सावधान! पाकिस्तानी ‘गोरी’सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक
भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास
दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले
थायलंडमध्ये सापडली २ हजार वर्षे जुनी भारतीय ब्राह्मी लिपी असलेली सोन्याची अंगठी
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सागरी संबंधांची समृद्ध परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य, सागरी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि गुंतवणुकीत सातत्याने वाढ झाली आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थैर्य आणि मुक्त सागरी वाहतुकीसाठीही दोन्ही देश एकत्रितपणे काम करत आहेत. या सन्मानामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नावावर परदेशी राष्ट्रांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी सन्मानांच्या यादीत आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराची भर पडली आहे. यापूर्वीही अनेक देशांनी भारतासोबतचे संबंध बळकट करण्यात त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले आहे.
