कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधेवर इराणचा हल्ला; पुढील पाच वर्षे १७% LNG उत्पादन ठप्प

दरवर्षी २० अब्ज डॉलर्स नुकसान होण्याची शक्यता

कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधेवर इराणचा हल्ला; पुढील पाच वर्षे १७% LNG उत्पादन ठप्प

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कतारच्या LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) उत्पादन क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना गंभीर नुकसान झाले असून, पुढील ३ ते ५ वर्षे देशाच्या एकूण LNG उत्पादन क्षमतेपैकी सुमारे १७% हिस्सा ठप्प राहणार असल्याची माहिती कतार एनर्जीचे सीईओ साद शरीदा अल-काबी यांनी दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

अल-काबी यांच्या मते, रास लाफान ऊर्जा केंद्रावर झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन LNG उत्पादन युनिट्स (S4 आणि S6) तसेच एक गॅस-टू-लिक्विड्स (GTL) प्रकल्प मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे १२.८ दशलक्ष टन LNG उत्पादनावर परिणाम झाला आहे. या प्रकल्पांची उभारणी खर्च सुमारे २६ अब्ज डॉलर्स इतका आहे. या हल्ल्यामुळे कतारला दरवर्षी सुमारे २० अब्ज डॉलर्स इतका महसुली तोटा सहन करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. याचा थेट परिणाम युरोप आणि आशियातील LNG पुरवठ्यावर होणार आहे.

कतार एनर्जीने आपल्या दीर्घकालीन LNG करारांवर ‘फोर्स मेज्योर’ लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, सध्याच्या परिस्थितीत कंपनीला करारातील अटी पूर्ण करता येणार नाहीत. अल-काबी यांनी स्पष्टपणे सांगितले की, उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम संघर्ष थांबणे अत्यावश्यक आहे. हल्ल्यांबाबत आश्चर्य व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “रमजानसारख्या पवित्र महिन्यात, एका मुस्लिम देशाकडून अशा प्रकारचा हल्ला होईल, अशी कल्पनाही मी केली नव्हती.”

नुकसानग्रस्त प्रकल्पांमध्ये अमेरिकेतील एक्सॉन मोबिल कंपनीची S4 मध्ये ३४% आणि S6 मध्ये ३०% भागीदारी आहे, तर GTL प्रकल्पात शेल कंपनी सहभागी आहे. GTL प्रकल्पाची दुरुस्ती सुमारे एक वर्षात होऊ शकते, मात्र LNG उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.

हे ही वाचा:

इराणमध्ये १९ वर्षीय चॅम्पियन कुस्तीपटूसह दोन आंदोलकांना सार्वजनिकरित्या दिली फाशी

दाऊदचा रत्नागिरीतील एक भूखंड विकला गेला १० लाखाला!

इराणच्या तेलावरील निर्बंध अमेरिका हटवणार? काय म्हणाले अमेरिकेचे अर्थमंत्री?

‘इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्याची क्षमता संपली!’

कतार हा जगातील सर्वात मोठा LNG निर्यातदार देश आहे. यापूर्वीच हल्ल्यांनंतर ‘फोर्स मेज्योर’ लागू करण्यात आला होता, जो आता वाढवण्यात आला असून संघर्षाच्या कालावधीनुसार तो पाच वर्षांपर्यंत कायम राहू शकतो. या हल्ल्यांचा परिणाम केवळ LNGपुरता मर्यादित नसून, कंडेन्सेटच्या पुरवठ्यात २४%, एलपीजीमध्ये १३%, हीलियममध्ये १४% आणि नेफ्था व सल्फरच्या पुरवठ्यात सुमारे ६% घट होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढेल, विशेषतः युरोप आणि आशियामध्ये, जिथे आधीच गॅस पुरवठ्यावर ताण आहे. रशियावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

Exit mobile version