एका अहवालात उघड झाले आहे की दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (ISKP) यांच्यात वाढत असलेले समन्वय पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) यांच्या रणनीतिक कारस्थानाचे द्योतक आहे. अलीकडील घडामोडींमध्ये ISKP चा समन्वयक मीर शफीक मेंगल याने लष्कर-ए-तोयबाचा नेता राणा मोहम्मद अशफाक याला शस्त्रास्त्रे भेट दिल्याची घटना या भागीदारीचे प्रतीक मानली जात आहे. आयएसआयच्या देखरेखीखाली जिहादी आणि सांप्रदायिक गटांना एकाच मंचावर आणले जात असल्याचे यातून स्पष्ट होते.
इंडिया नॅरेटिव्हमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या तथाकथित “डीप स्टेट”ने दहशतवाद केवळ सहनच केला नाही, तर त्याला राज्य धोरणाचा सुनियोजित भाग बनवले आहे. या संपूर्ण यंत्रणेचा केंद्रबिंदू आयएसआय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आयएसआय केवळ दहशतवादी संघटनांना आश्रय देत नाही, तर लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत आणि हमास यांसारख्या संघटनांना जोडून एक प्रकारचे “अपवित्र गठबंधन” उभे करत आहे.
अहवालात सांगण्यात आले आहे की ऑपरेशन सिंदूरनंतर- ज्यात मुरिदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयाला मोठा फटका बसला आणि या संघटनांमधील परस्पर संबंध उघड झाले. आयएसआयने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले. आयएसआयने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी एकत्र काम करण्याचे निर्देश दिले. परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांच्या जनाजांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत, तर राजकारणी लष्कर-ए-तोयबाचे उपनेते सैफुल्लाह कसूरी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसत आहेत.
अहवालानुसार, लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता रऊफ याने परेडदरम्यान राज्याच्या संरक्षणाखाली जिहादासाठी भरती सुलभ असल्याचे सांगितले. त्या वेळी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही उपस्थित होता. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की आयएसआयशी संबंधित या नेटवर्कमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या शहरी लॉजिस्टिक्स आणि ऑपरेटिव्ह क्षमतांचा, जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती हल्ल्यांच्या क्षमतेशी मेळ घातला जात आहे. याला हमासकडून मिळणाऱ्या सामरिक सहकार्यामुळे आणखी बळ मिळते. यांचा उद्देश भारताविरुद्ध दीर्घकाळ चालणाऱ्या हिंसक रणनीतीला पुढे नेणे हा आहे.
हे ही वाचा:
इंदूरमध्ये दूषित पाणी पिल्याने २२ जण आजारी
खलिस्तान समर्थक दहशतवादी पन्नूविरुद्ध दिल्लीत एफआयआर
ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’त सामील होण्यावरून पाकमध्ये गदारोळ
दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘बोर्ड ऑफ पीस’ करारावर स्वाक्षरी
तथापि, अहवालात हेही अधोरेखित करण्यात आले आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज भारतीय सुरक्षा दल या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. ड्रोन जॅमर, अँटी-ड्रोन स्वॉर्म्स आणि लेझर काउंटरमेजर्स आयईडी टाकण्याच्या कटकारस्थानांना हाणून पाडण्यासाठी तैनात आहेत. अहवालानुसार, नियंत्रण रेषेवर (एलओसी) सेन्सर ग्रिड्स आणि रणनीतिक हेलिकॉप्टर पॅड्समुळे त्वरित कारवाई शक्य होत आहे. तसेच सायबर युनिट्स हवाला नेटवर्क्स आणि दुष्प्रचार मोहिमा उधळून लावण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. भारतीय सशस्त्र दल जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारच्या हवाई सहाय्याला आळा घालण्यासाठी आकाशावर कडक नजर ठेवून आहेत आणि परकीय गुप्तचर माहितीच्या संभाव्य दुरुपयोगाबाबतही सतर्क आहेत.
