पाक संरक्षण मंत्री खरं बोलले, मदरशात शिकणारे विद्यार्थी दुसरे संरक्षण दल

व्हिडीओ व्हायरल होताच उठली टीकेची झोड

पाक संरक्षण मंत्री खरं बोलले, मदरशात शिकणारे विद्यार्थी दुसरे संरक्षण दल

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची नव्याने समोर येणारी विधाने ही अचंबित करणारी असून यामुळे पाकिस्तानची नाचक्की वारंवार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा पाकिस्तानी मंत्र्यांकडून केली जाणारी विधाने हास्यास्पद ठरत असून यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरही लाज निघत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावादरम्यान ख्वाजा आसिफ यांचे संसदेतील एक धक्कादायक विधान समोर आले आहे. त्यांच्या विधानावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

संसदेत बोलताना ख्वाजा आसिफ म्हणतात की, मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाचे दुसरे संरक्षण दल आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना हे विधान केले. याचा व्हिडीओही समोर आला आहे. यात ते म्हणताना ऐकू येत आहे की, “मदरसे किंवा मदरशांच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर, ते आमचे दुसरे संरक्षण दल आहेत यात शंका नाही. वेळ आल्यावर, तिथे शिकणाऱ्या तरुणांचा गरजेनुसार १०० टक्के वापर केला जाईल.” त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ख्वाजा यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून संसदेत असे विधान कसे केले जाऊ शकते असा सवाल विचारला जात आहे. बोलताना त्यांनी तारतम्य बाळगायला हवे, असा खोचक सल्लाही अनेकांनी दिला आहे. मदरशामध्ये शिकणारी मुले विद्यार्थी असून प्रशिक्षित सैनिक नाहीत हे मंत्र्यांनी लक्षात ठेवावे, असं म्हणत ख्वाजा आसिफ यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

विचित्र आणि हास्यस्पद विधाने करण्यात ख्वाजा आसिफ हे सध्या आघाडीवर असून त्यांच्या अनेक अशा विधानांमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज निघाली आहे. नुकतेच ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानने जाणूनबुजून भारतीय ड्रोनना रोखले नाही जेणेकरून त्यांची लष्करी ठिकाणे उघड होऊ नये. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर जबरदस्त टीका केली गेली तर हे उत्तर हास्यास्पद असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वी, सीएनएनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ख्वाजा यांना भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांबद्दल विचारले असता त्यांनी सोशल मीडियावरील माहिती पुरावे असल्याचा दावा केला होता. यामुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नाचक्कीही झाली होती. तर, यापूर्वी त्यांनी पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याची कबुलीही दिली होती.

Exit mobile version