बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शनिवारी दिवंगत उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सांगितले की हा कट्टर विचारांचा नेता लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहील आणि त्यांनी ज्यासाठी उभे आयुष्य घालवले, त्या आदर्शांचे पालन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हादीने भारतविरोधात भूमिका घेतली होती आणि तो बांगलादेशातील जेन झी आंदोलनाचा चेहरा बनला होता. त्या दरम्यान त्याची हत्या झाली.
हजारो शोकाकुल नागरिकांना संबोधित करताना युनूस म्हणाले की, बांगलादेशभर तसेच परदेशात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांमध्ये उस्मान हादी यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.
हे ही वाचा:
राहुल गांधी जर्मनीत भारतविरोधी लोकांना का भेटले?
मराठी पंतप्रधान होता होता राहिला!
भ्रष्टाचाराचे खटले हस्तांतरित करण्याची राबडी देवींची याचिका फेटाळली
सूर्यकुमार सरदार, मावळ्यांची फौज जाहीर
“प्रिय उस्मान हादी, आम्ही येथे तुम्हाला निरोप देण्यासाठी आलेलो नाही. तुम्ही आमच्या हृदयात कायम आहात. जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात आहे, तोपर्यंत तुम्ही या राष्ट्राचा अविभाज्य भाग राहाल,” असे ते म्हणाले.
युनूस यांनी हादी यांच्या राजकीय कार्यपद्धतीची आठवण करून देत सांगितले की, लोकांशी नम्रतेने कसे जोडले जावे, कोणालाही दुखावल्याशिवाय आपली मते कशी मांडावीत आणि राजकीय मोहिमा सुसंस्कृतपणे कशा चालवाव्यात, हे हादी यांनी दाखवून दिले.
“हा धडा आम्ही स्वीकारतो आणि तो अंमलात आणण्याची आमची इच्छा आहे. आमची राजकीय संस्कृती अशा पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे की, हादी यांचे उदाहरण कायम जिवंत राहील,” असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, नेतृत्व कोणासमोरही झुकणार नाही आणि जगासमोर अभिमानाने मस्तक उंच ठेवेल. हा हादी यांनी जनतेला दिलेला शब्द होता, जो आता पूर्ण केला जाईल, असे युनूस म्हणाले.
युनूस सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम
दरम्यान, इन्किलाब मंचचे आणि उस्मान हादीचे सहकारी अब्दुल्ला अल जाबेर यांनी युनूस सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हादीच्या हत्येस जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती पुढील २४ तासांत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बंगालमध्ये युनूस यांचा पुतळा जाळला
याशिवाय, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे निदर्शने करण्यात आली. बंगिया हिंदू मंच या संघटनेने व्हीनस मोअर चौकात मशाल मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान निदर्शकांनी मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळला. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचार आणि पद्धतशीर छळाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
सभेला संबोधित करताना बंगिया हिंदू मंचचे अध्यक्ष बिक्रमादित्य मंडल यांनी बांगलादेश प्रशासनावर हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. अलीकडेच केवळ धार्मिक ओळखीमुळे एका निरपराध हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली.
