अमेरिकेने लेमोआ करारांतर्गत इराणवर बॉम्बहल्ला करण्यासाठी भारताचा भूभाग वापरण्याची परवानगी मागितली होती, अशा आशयच्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या दाव्यांना केंद्र सरकारने ठामपणे फेटाळले आहे. हा दावा “निराधार” असल्याचे सरकारने स्पष्ट केले असून अशी कोणतीही बाब घडलेली नसल्याचे सांगितले आहे.
भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारे दावे- ज्यात अमेरिकेने ईराणवर हल्ला करण्यासाठी भारताच्या पश्चिम सीमावर्ती भागाचा वापर करण्याची परवानगी मागितल्याचे म्हटले जात होते ते पूर्णपणे चुकीचे आहेत. विशेषतः लेमोआ कराराच्या संदर्भात केलेले हे दावे “निराधार” असल्याचे सरकारने नमूद केले असून नागरिकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर संदेश देत म्हटले आहे, “कृपया सोशल मीडियावरील अशा खोट्या आणि निराधार दाव्यांपासून सावध राहा.” तसेच, अशा दाव्यांना कोणताही तथ्यात्मक आधार नसल्याचे सांगत अप्रमाणित माहिती शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
लेमोआ (LEMOA) करारावर भारत आणि अमेरिकेने २०१६ मध्ये स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर लॉजिस्टिक सहाय्यासाठी- जसे की इंधन भरणे (refueling) आणि दुरुस्ती करण्याची परवानगी मिळते. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की हा करार कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या भूभागावरून आक्रमक लष्करी कारवाया करण्याची परवानगी देत नाही, हे भारतीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी बंद; २० देशांची नाराजी
मिराज-2000 लढाऊ विमाने २०३८-३९ पर्यंत देणार सेवा
पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह एआय फोटो पोस्ट केल्याप्रकरणी बिहारमधून एकाला अटक
मालदीवमध्ये झालेल्या स्पीडबोट अपघातात रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी
दरम्यान, काही अहवालांमध्ये अमेरिकेने श्रीलंकेजवळ एका इराणी युद्धनौकेवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भारताची भूमिका असल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, भारताने त्या ठामपणे नाकारत स्पष्ट केले की अशा कोणत्याही कारवाईसाठी भारतातील बंदरे किंवा लष्करी सुविधा वापरण्यात आलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यापूर्वीही अशाच प्रकारच्या दाव्यांना “खोटे आणि दिशाभूल करणारे” ठरवून फेटाळले आहे आणि नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित माहिती शेअर करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
