पीओकेमध्ये पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले

हेलिकॉप्टरमधील सर्व जवानांचा मृत्यू

पीओकेमध्ये पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले

पाकिस्तानव्याप्त काश्मीरची (पीओके) राजधानी मुजफ्फराबाद जवळ पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक माध्यमांनी लष्करी प्रवक्त्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर), सांगितले की पाकिस्तानी लष्कराच्या एव्हिएशन विंगचे एमआय-17 हेलिकॉप्टर बुधवारी (१० जून) मुजफ्फराबादजवळ कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ‘डॉन’ या वृत्तपत्राने आयएसपीआरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्यातून हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की त्यातील कोणालाही वाचवता आले नाही.

अपघाताची माहिती मिळताच लष्कराच्या बचाव आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोध व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती तांत्रिक बिघाडासह इतर संभाव्य कारणांचाही सखोल तपास करणार आहे. हेलिकॉप्टरमध्ये किती लष्करी कर्मचारी होते आणि त्यांची ओळख काय होती, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अपघाताची कारणे आणि इतर तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण ही घटना पीओकेमध्ये घडली असून सध्या तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्राथमिक अहवालांमध्ये हा अपघात आपत्कालीन लँडिंगदरम्यान झाल्याचे म्हटले जात असले, तरी परिसरातील हिंसक संघर्ष, आंदोलन आणि वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरवर हल्ला झाला होता का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा:

ममतांना नवा दणका; खासदार सुष्मीता देव यांनी सोडला पक्ष

पश्चिम आशियातील तणावाचा अमेरिकेला आर्थिक लाभ

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १३ ठार

मुंबईहून भरारी, जगभर आंब्यांची स्वारी!

अलीकडच्या काळात पीओकेमध्ये जेके संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी च्या नेतृत्वाखाली आंदोलनांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या असून त्यात मृत्यू आणि मोठ्या प्रमाणावर अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची तैनाती यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही वृत्त आहे. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

Exit mobile version