भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अमेरिकेतील फॉरेन एजंट्स नोंदणी कायदा (फारा) अंतर्गत सार्वजनिक झालेल्या दस्तऐवजांनुसार, पाकिस्तानने या काळात अमेरिकेकडे वारंवार मदतीसाठी धाव घेतली. भारताच्या ठोस लष्करी कारवाईमुळे दबावाखाली आलेल्या पाकिस्तानने अमेरिकेत लॉबिंग करण्यासाठी तब्बल ४५ कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.
या दस्तऐवजांनुसार, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना आणि त्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेतील विविध सरकारी विभाग, खासदार, थिंक टँक तसेच धोरणकर्त्यांशी सुमारे ६० वेळा संपर्क साधला. दूरध्वनी कॉल, ई-मेल, प्रत्यक्ष बैठका आणि अधिकृत पत्रव्यवहाराच्या माध्यमातून भारतावर राजनैतिक दबाव आणावा, संघर्षात अमेरिका मध्यस्थी करावी आणि पाकिस्तानची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडावी, असा प्रयत्न करण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी पाकिस्तानने अमेरिकन लॉबिंग कंपन्यांची मदत घेतली होती. या कंपन्यांच्या माध्यमातून भारताच्या सैनिकी कारवाईबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही या कागदपत्रांत नमूद आहे. विशेष म्हणजे, संघर्ष थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची आणि संवाद सुरू करण्याची मागणी पाकिस्तानकडूनच करण्यात आली होती, हे या खुलाशांतून अधोरेखित होते.
ऑपरेशन सिंदूर हे भारताने दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उचललेले कठोर आणि निर्णायक पाऊल मानले जाते. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये केवळ लष्करीच नव्हे, तर राजकीय पातळीवरही मोठी चिंता आणि अस्थिरता निर्माण झाली होती. फारा अंतर्गत समोर आलेल्या या खुलाशांमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपळ, दबावतंत्र आणि त्यामागची भीती आता संपूर्ण जगासमोर उघड झाली आहे.
