थायलंडची राजधानी बँकॉकमधील एक वर्दळीचा रस्ता अचानक खचला आणि त्या जागी ५० मीटर खोल खड्डा पडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. या अपघातामुळे बँकॉकच्या वजीरा हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करावा लागला. तसेच या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेत काही वाहनांचे आणि रस्त्यालगतच्या विजेच्या खांबांचे नुकसान झाले आहे.
बँकॉकमधील एका रुग्णालयासमोर ५० मीटर खोल खड्डा पडून बुधवारी पहाटे ही घटना घडली. यात या भागात उभ्या असलेल्या गाड्या आणि विजेचे खांब गाडले गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून जवळच्याच एका भूमिगत रेल्वे स्थानकाला या अपघातासाठी जबाबदार धरले जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रस्ता खचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना आणि रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. खड्डा पडला तेव्हा रस्त्यावर अनेक वाहने उभी होती आणि रस्ता खचत असल्याचे पाहून अनेकांनी आपापल्या गाड्या हटवल्या तर काही गाड्या खड्यात पडल्या. यात सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. आपत्कालीन आणि अभियांत्रिकी पथके परिसर साफ करण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी काम करत आहेत, असे सांगण्यात येत आहे. सिंकहोलमुळे संपूर्ण पायाभूत सुविधांना धोका निर्माण झाला आहे आणि प्रवाशांसाठी चिंता निर्माण झाली आहे, त्यामुळे स्टेशन बंद करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
पाश्चात्य देशांनी भारताशी त्यांचे संबंध अधिक दृढ करा! फिनलंडचे अध्यक्ष असे का म्हणाले?
रेडलाईन मेट्रोत सिग्नल बिघाड; प्रवासी रागाने लालेलाल!
काँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज!
दिल्लीतील संस्थेत १७ मुलींशी अश्लील वर्तन; संचालक चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा
बँकॉकचे गव्हर्नर चॅडचार्ट सिट्टीपुंट म्हणाले की, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यांनी असेही म्हटले की अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हा अपघात भूमिगत रेल्वे स्थानकावरील बांधकामामुळे झाला आहे. दरम्यान, रुग्णालयाने दोन दिवसांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्याने, अधिकारी शक्य तितक्या लवकर खड्डा दुरुस्त करण्याचे काम करत आहेत, असे गव्हर्नर म्हणाले.
