अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान जयशंकर रशियाला भेट देणार!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती 

अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान जयशंकर रशियाला भेट देणार!

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर लवकरच रशिया दौरा करणार आहेत. “२१ ऑगस्ट रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची मॉस्को येथे चर्चा होणार आहे. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहकार्याच्या  प्रमुख बाबींवर चर्चा होईल,” असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीटद्वारे म्हटले आहे.

भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर ही भेट होत आहे. शनिवारी (९ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापार अनिश्चितता आणि शुल्क घोषणांदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील घडामोडींवर चर्चा केली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी शांततापूर्ण तोडग्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीला प्रतिसाद म्हणून भारतीय आयातीवर जास्त शुल्क जाहीर केल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. ६ ऑगस्ट रोजी, ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्याबद्दल २५ टक्के अतिरिक्त दंड आकारण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे एकूण आयात शुल्क ५० टक्क्यांवर गेले.

हे ही वाचा : 

कबुतरखाना : आधी लोकांचे अभिप्राय जाणून घ्या – कोर्ट

मुत्सद्देगिरी, धर्मनिष्ठता यांचे प्रतिक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

चाकरमान्यांनू गणपतीक गावाक जावचा हा ना.. चला “मोदी एक्सप्रेस”ने

जनता नाकारते म्हणून राहुल गांधी मतदार यादीवर प्रश्न निर्माण करतात

नवीन शुल्क आकारणी दोन टप्प्यात लागू होईल. पहिला २५ टक्के कर ७ ऑगस्ट रोजी लागू झाला, तर शुल्काचा दुसरा भाग, म्हणजेच दंड, २८ ऑगस्टपासून लागू होईल. दरम्यान, डोभाल यांनी सांगितले की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. २०२५ च्या अखेरीस हा दौरा होण्याची अपेक्षा आहे.

“राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीबद्दल जाणून आम्हाला खूप उत्साह आणि आनंद झाला आहे. मला वाटते की तारखा आता जवळजवळ निश्चित झाल्या आहेत,” असे डोभाल म्हणाले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होत आहे. भारतासह इतर देशही या भेटीकडे लक्ष लावून आहेत.

Exit mobile version