“ओसामा पाकमध्ये असताना मारला गेला ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही”

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायलने पाकचे काढले वाभाडे

“ओसामा पाकमध्ये असताना मारला गेला ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही”

अल-कायदाचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर आश्रय दिला होता आणि त्यांच्या भूमीवरच त्याला ठार करण्यात आले होते ही वस्तुस्थिती पाकिस्तान बदलू शकत नाही, असे म्हणत इस्रायलने पाकिस्तानला सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायलने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.

इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनी डॅनन यांनी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांच्याकडे हात दाखवत म्हटले की, जेव्हा पाकिस्तानमध्ये बिन लादेनचा खात्मा करण्यात आला तेव्हा प्रश्न परदेशी भूमीवर दहशतवाद्याला लक्ष्य का करायचे? हा नव्हता तर प्रश्न असा होता की, एका दहशतवाद्याला आश्रय का देण्यात आला? आणि आजही तोच प्रश्न विचारला पाहिजे. बिन लादेनला कोणतीही सूट नव्हती आणि हमासलाही सूट असू शकत नाही, असे डॅनन यांनी ठणकावून सांगितले. कतारची राजधानी दोहा येथे हमास नेत्यांवर इस्रायली हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायल आणि पाकिस्तानच्या राजदूतांमध्ये जोरदार वाद झाला.

भाषणात, पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी कतारविरुद्ध इस्रायलच्या बेकायदेशीर आणि विनाकारण केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध केला. तसेच ते प्रादेशिक शांततेला क्षीण करणाऱ्या व्यापक आणि सातत्यपूर्ण आक्रमकतेचा भाग असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी इस्रायलवर गाझामध्ये क्रूर लष्करी कारवाया करून आणि सीरिया, लेबनॉन, इराण येमेनमध्ये वारंवार सीमापार हल्ले करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला.

दरम्यान, बिन लादेनने घडवून आणलेल्या न्यू यॉर्क शहरातील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. यावेळी डॅनन म्हणाले, तो दुःखद दिवस, इस्रायलसाठी ७ ऑक्टोबर सारखाच रक्तरंजित दिवस होता. ९/११ च्या हल्ल्यानंतरच्या काळात सुरक्षा परिषदेने एक ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की कोणताही देश दहशतवाद्यांना आश्रय देऊ शकत नाही, त्यांना निधी देऊ शकत नाही, याची त्यांनी आठवण करून दिली.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींनी बैराबी-सैरांग रेल्वे मार्गाचे केले उद्घाटन !

पाकिस्तानातील लष्करी ताफ्यावर हल्ला करून १२ जवान मारले!

भारत-पाकिस्तान सामना पाहू नका, टीव्ही बंद ठेवा!

घाटकोपरमध्ये कार फुटपाथवर चढली; कार चालक तरुणी पोलिसांच्या ताब्यात

डॅनन पुढे म्हणाले की, ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये मारला गेला होता आणि कोणीही अमेरिकेचा निषेध केला नाही. जेव्हा या परिषदेतील इतर देश दहशतवाद्यांवर हल्ला करतात तेव्हा कोणीही त्यांचा निषेध करत नाही. तर, इस्रायलला वेगळे न्याय का आणि ही या संस्थेची समस्या आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता आणि तो तुमच्या हद्दीत मारला गेला ही वस्तुस्थिती पाकिस्तान बदलू शकत नाही. जेव्हा इस्रायलवर टीका केली जाते आणि ते भविष्यातही चालू राहील, तुमच्या देशासाठी कोणते नियम लागू करता आणि इस्रायलसाठी कोणते नियम लागू होतात, असा सवाल त्यांनी केला आहे.

Exit mobile version