बांगलादेशात २०२४ मधील आंदोलनांदरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर ११२ जणांविरोधात दाखल करण्यात आलेले हत्या प्रयत्नाच्या प्रकरणा संबंधी नवी माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांना कथित पीडिताचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. चौकशीत तक्रारीतील मूळ तथ्यांची पुष्टी होऊ शकलेली नाही, तसेच ओळखीसंबंधी सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी न्यायालयाला कळवले आहे की, त्यांनी हे प्रकरण पुढे न नेण्याची शिफारस केली असली, तरी तसे न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.
पोलिस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (PBI) ने ढाका न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण तथ्यात्मक चुका आणि विसंगतींनी भरलेले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, कथित पीडिताचा कोणताही अस्तित्वात पुरावा आढळून आलेला नाही. PBI च्या माहितीनुसार, तक्रारदाराने ज्याला आपला लहान भाऊ सांगून जखमी झाल्याचा दावा केला होता, तो व्यक्ती ना दिलेल्या पत्त्यावर कधी राहिला होता, ना त्याची ओळख पटवणारे किंवा वैद्यकीय उपचारांचे कोणतेही पुरावे सापडले. PBI ने शेख हसीना आणि इतर ११२ आरोपींना या प्रकरणातून मुक्त करण्याची शिफारस केली आहे.
संबंधित प्रकरण ३ सप्टेंबर २०२४ रोजी ढाक्यातील धनमंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. तक्रारदाराने स्वतःला मोहम्मद शरीफ असे सांगून आरोप केला होता की, ४ ऑगस्ट २०२४ रोजी धनमंडी २७ परिसरातील मीना बाजाराजवळ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्याचा भाऊ शाहेद अली याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या तक्रारीत एकूण ११३ जणांना आरोपी करण्यात आले होते, ज्यात शेख हसीनाही होत्या. तसेच ढाका कॉलेज आणि सिटी कॉलेजमधील नऊ विद्यार्थ्यांना जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र त्यांच्या पत्त्यांचा किंवा वैद्यकीय कागदपत्रांचा कोणताही तपशील देण्यात आलेला नव्हता. तपासात असेही समोर आले की तक्रारीत दिलेले राष्ट्रीय ओळखपत्र बनावट होते आणि ते कोणत्याही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेले नव्हते. कॉलेज प्रशासनालाही इतर कथित जखमी विद्यार्थ्यांची ओळख पटवता आलेली नाही. PBI च्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून दिलेल्या वेळेस आणि ठिकाणी अशी कोणतीही घटना घडल्याचे दिसून येत नाही.
हे ही वाचा..
अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेणार? नव्या विधेयकामुळे खळबळ
इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांच्या सात एजन्सींमधून बाहेर पडण्याचा निर्णय
१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती
थायलंडमध्ये रेल्वेवर क्रेन कोसळून झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू
याशिवाय, तर तक्रारदाराची स्वतःची ओळखही संशयास्पद ठरली. ज्या पत्त्यावर तो स्वतःला रहिवासी सांगत होता, त्या घरमालकाने त्या नावाची कोणतीही व्यक्ती कधीही राहिली नसल्याचे स्पष्ट केले. नंतर तपासात उघड झाले की त्याचे खरे नाव शरीफुल इस्लाम असून तो लक्ष्मीपूर सदरमधील मंदरारी भागातील रहिवासी आहे. मात्र, तेथील स्थानिक लोकही त्याला ओळखत नव्हते. तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याच्याकडे वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्यास सांगितले, तेव्हा तो ते करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. PBI ने मान्य केले आहे की या अहवालासंदर्भात त्यांच्यावर दबाव आहे, मात्र एजन्सीने असेही स्पष्ट केले की सर्व प्रकरणांची तपासणी प्रामाणिकपणे केली जात आहे. जिथे पुरावे आढळले तिथे आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर जिथे पुरावे मिळाले नाहीत तिथे प्रकरणे फेटाळण्याची शिफारस करण्यात आली, असे PBI ने सांगितले.
