आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बाजारात जाण्याऐवजी मोबाईलवरून काही मिनिटांत फळं, भाज्या आणि किराणा घरपोच मागवण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेळ वाचवणारी ही सुविधा सोयीची असली, तरी घरपोच येणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी महागात पडू शकतं. मुंबईतील एका क्विक-कॉमर्सच्या वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत याच धोक्याची गंभीर बाब समोर आली आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील एका वितरण केंद्राच्या तपासणीदरम्यान फळं आणि भाज्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आला. याशिवाय काही मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठाही आढळला. अन्नपदार्थ ज्या ठिकाणी साठवले जातात, त्या परिसराची स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याचे तपासणीत दिसून आले. या गंभीर त्रुटींनंतर संबंधित वितरण केंद्राचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
दोन विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजवर आता ‘क्वालिफायर’ची वेळ!
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग
श्रीलंकेविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ विक्रम!
राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल
ही घटना केवळ एका ठिकाणच्या कारवाईपुरती मर्यादित नसून, बदलत्या लाइफस्टाईलकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा इशारा मानला जात आहे. ऑफिसची धावपळ, वाढती कामाची व्यस्तता आणि वेळेची कमतरता यामुळे ऑनलाइन किराणा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी फळं, रात्रीच्या जेवणासाठी भाज्या किंवा अचानक लागणारा किराणा काही मिनिटांत घरपोच मिळतो. मात्र, डिलिव्हरीचा वेग जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्या अन्नाची स्वच्छता, ताजेपणा आणि सुरक्षित साठवणूक महत्त्वाची आहे.
विशेषतः फळं आणि भाज्या थेट खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकात वापरण्यापूर्वी त्यांची नीट तपासणी करणं गरजेचं आहे. फळं-भाज्यांवर डाग, दुर्गंधी, कीटक किंवा खराब झाल्याची चिन्हं दिसल्यास ती वापरू नयेत. घरपोच आलेल्या वस्तू योग्य पद्धतीने स्वच्छ करून आणि आवश्यकतेनुसार रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणंही महत्त्वाचं आहे. पॅकेजिंग खराब, फाटलेलं किंवा संशयास्पद वाटल्यास ते उत्पादन वापरण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याकडे तक्रार करणं योग्य ठरेल.
या घटनेमुळे ‘वेळ वाचवणारी खरेदी’ आणि ‘आरोग्यदायी खरेदी’ यामध्ये योग्य संतुलन राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ऑनलाइन खरेदी करताना फक्त किंमत, ऑफर किंवा डिलिव्हरीचा वेळ न पाहता अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता यालाही तितकंच महत्त्व देणं आवश्यक आहे.
