Apple COO Sabih Khan : ‘अ‍ॅपल’च्‍या ‘सीओओ’पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती

Apple COO Sabih Khan : ‘अ‍ॅपल’च्‍या ‘सीओओ’पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती

अ‍ॅपल इन्कॉर्पोरेटेडने भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी व कंपनीतील दीर्घकालीन वरिष्ठ पदाधिकारी सबिह खान यांची मुख्य संचालन अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.सबिह खान हे जेफ विल्यम्स यांच्यानंतर हे पद भूषवणार आहेत.

या महिन्याच्या अखेरीस औपचारिकपणे ते ‘सीओओ’पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ५८ वर्षीय सबिह खान गेली तीस वर्ष अ‍ॅपल कंपनीत कार्यरत आहेत.

सध्या ते कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीची जागतिक पुरवठा साखळी, पुरवठादार जबाबदारी कार्यक्रम आणि विविध ऑपरेशन्स टीम्स यांचे नेतृत्व ते करत आहेत.कंपनीच्या निवेदनानुसार, याच महिन्यात जेफ विल्यम्स यांच्याकडून सबिह खान या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

विल्यम्स हे सीइओ टिम कुक यांना रिपोर्ट करत राहतील, तसेच डिझाईन टीम आणि अ‍ॅपल वॉच विभागाची जबाबदारी त्‍यांच्‍यावर असेल. अ‍ॅपलचे सीइओ टिम कुक यांनी सबिह खान यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना त्यांना कंपनीच्या पुरवठा साखळीचे मुख्य शिल्पकार म्हणून गौरविले आहे. खान यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅपलने प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामध्ये नवकल्पना केली आणि अमेरिकेतील उत्पादन साखळीचा विस्तार केला, असे कुक यांनी नमूद केले.

सबिह हे एक विलक्षण रणनीतिकार असून, अ‍ॅपलच्या पुरवठा साखळीचे प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांनी अ‍ॅपलसाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले, अमेरिकेतील उत्पादन केंद्रांचा विस्तार साधला आणि जागतिक आव्हानांना तोंड देताना कंपनीला लवचिक बनवले, पर्यावरणीय शाश्वततेच्या क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वामुळे अ‍ॅपलच्या कार्बन उत्सर्जनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असेही कुक म्‍हणाले.

सबिह खान १९९५ मध्ये अ‍ॅपलच्या खरेदी विभागात दाखल झाले. कंपनीच्‍या वेबसाइटनुसार, नावीन्यपूर्ण उत्पादनांची डिलिव्हरी वेळेवर सुनिश्चित करणे, जागतिक ऑपरेशन्स धोरण ठरवणे, आणि पुरवठा साखळीचे रूपांतर करणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.

२७ जून २०१९ रोजी त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी थेट जेफ विल्यम्स यांना रिपोर्ट करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात अ‍ॅपलने हरित तंत्रज्ञानासोबत भागीदारी निर्माण केली तसेच कोविड-१९ महामारीच्या काळात पुरवठादारांच्या कार्यपद्धतींमध्ये आवश्यक बदल केले. सबिह खान यांचा जन्म १९६६ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला.

शालेय शिक्षणाच्या काळातच त्यांचे कुटुंब सिंगापूरमध्ये स्थायिक झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी ते अमेरिकेत गेले. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि यांत्रिक अभियांत्रिकी या दोन विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी न्यूयॉर्कच्या रेन्सीलेअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (RPI) येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

Exit mobile version