राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.
माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो मंत्री असो किंवा अन्य कोणीही असो, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी न्यायालयात हजर राहणे, अपेक्षित होते. मात्र, ते काल सुनावणीला हजर राहिले नाहीत, यावरुन न्यायालयाने त्यांना फटकारले. माणिकराव कोकाटे हे अटक टाळण्यासाठी कालच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्या अंजली दिघोळ यांनी केला. दरम्यान, आजच्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. परंतु, कोकाटे यांनी तशी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
प्रकरण काय?
१९९५- १९९७ च्या दरम्यानचे हे प्रकरण असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांचे उत्पन्न कमी असल्याचे दाखवून दुसरे घर नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली म्हणून केली हत्या; दोन मुलींनाही संपवले
“भारतीय सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य!”
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच शूटर्सना अटक
पंतप्रधान मोदी इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित!
दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
