गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला

गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेना नेते भरत गोगावले, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजप नेते गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे हे पद देण्यात आल्याने यापूर्वी महायुतीमध्ये नाराजी आणि राजकीय रस्सीखेच निर्माण झाली होती. अखेर आता गोगावले यांच्याकडे रायगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांची नावे चर्चेत होती. यापूर्वी महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती; मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे रायगड आणि नाशिकच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. आता महाजन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाचे आणखी दोन वैमानिक ड्रग्ज चाचणीत अयशस्वी

जुलैमध्ये बांगलादेशात पाठवलेल्या महिलेला मुंबईत पुन्हा अटक

लक्ष्मी मित्तल यांच्या युक्रेनमधील स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला

कच्च्या तेलाची धग बाजाराला; सेन्सेक्स ३०० अंकांहून अधिक घसरला

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद होते. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्या नावांवरून राजकीय रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री नियुक्ती रखडली होती. अखेर भरत गोगावले यांच्याकडे रायगड आणि गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक अशी जबाबदारी निश्चित झाल्याने महायुती सरकारमधील हा महत्त्वाचा राजकीय पेच सुटला आहे.

Exit mobile version