झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहिले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
झारखंडमध्ये झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. रांचीतील जयपाल सिंग स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाचा १७ ऑगस्ट रोजी सलग २४वा दिवस आहे. काही विद्यार्थी अनिश्चित काळासाठी उपोषणावरही असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्ण असून त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले आहे. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी समिती स्थापन केली असून, या माध्यमातून चर्चा सुरू केल्याबद्दल त्यांनी सोरेन यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अनेक मागण्यांवर सरकार आणि आंदोलकांमध्ये एकमत झाल्याचा आपला विश्वास असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा भारतीय लोकशाहीच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपवरही शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या शोषण आणि दडपशाहीचे साधन बनली असून, दशकभरापूर्वी असलेली मजबूत ज्ञानप्रणाली आता राहिलेली नाही.
हे ही वाचा:
एल निनोचे महासंकट; जागतिक अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरचा धोका?
जुलैमध्ये बांगलादेशात पाठवलेल्या महिलेला मुंबईत पुन्हा अटक
लक्ष्मी मित्तल यांच्या युक्रेनमधील स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला
कच्च्या तेलाची धग बाजाराला; सेन्सेक्स ३०० अंकांहून अधिक घसरला
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करत राहुल गांधी यांनी “भारताची तरुण पिढी हेच देशाचे भविष्य आहे”, अशी भूमिका मांडली. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना एकजूट आणि पाठिंबा देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री सोरेन यांना विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन या प्रश्नावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
