केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवल्याचा आरोप आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, “असा विरोधी पक्षनेता पाहणेच बाकी होते. हे देशाच्या लोकशाहीचे दुर्दैव आहे.”
आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “असा विरोधी पक्षनेता पाहणेच बाकी होते, हे देशाच्या लोकशाहीचे दुर्दैव आहे. काँग्रेससाठी यापेक्षा दुःखाची बाब कोणती असू शकते की त्यांना राहुल गांधींना आपला नेता मानावे लागत आहे.”
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले, “राजकारणातील मतभेद आणि असहमती यांचे स्वतःचे स्थान आहे; मात्र राहुल गांधी यांच्या भाषेमुळे आता त्यांच्या संगोपनावर आणि संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. ज्या कुटुंबातील महिलांनी देशातील सर्वोच्च पदांवर काम केले, अशा राहुल गांधींकडून एका महिला राष्ट्रप्रमुखाबद्दल अशोभनीय टिप्पणी केली जाणे, त्यांची मानसिकता दर्शवते.”
हे ही वाचा:
दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात
५ वर्षात महाराष्ट्रात ३६ हजार २११ कंपन्या बंद पडल्या?
उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू
त्या फोटोमुळे राहुल अधिकच पिसाटले का?
खासदार गोपाल ठाकूर म्हणाले, “राहुल गांधींची भाषा दिवसेंदिवस अधिक खालावत चालली आहे. देशाच्या पंतप्रधानांसाठी अशा पातळीवरील भाषेचा वापर कोणत्याही सभ्य राजकीय संस्कृतीत स्वीकारला जाऊ शकत नाही. ही भारताची भाषा नाही, तर भारतीय राजकारणाच्या मर्यादेला लागलेला कलंक आहे.”
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत, “इतर नेत्यांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही,” असे म्हटले. याच कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारली. त्यावर संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नाव घेत प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी मिठी मारल्यानंतर संदीप दीक्षित म्हणाले, “मेलोनी समजून तर पकडले नव्हते.” त्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यावर टिप्पणी केली.
