भाजपच्या ‘जन आक्रोश’वर गुन्हा

नियमावली धाब्यावर बसवल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

भाजपच्या ‘जन आक्रोश’वर गुन्हा

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीने मंगळवारी वरळी परिसरात काढलेला ‘जन आक्रोश मोर्चा’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या मोर्चादरम्यान वाहतुकीचे नियम आणि पोलिसांच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी आयोजकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला होता.

भाजपच्या वतीने मंगळवारी वरळीच्या रस्त्यांवर महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, या भव्य मोर्चामुळे वरळी नाका आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. गर्दी इतकी प्रचंड होती की, रस्ते पूर्णपणे जाम झाले होते.

वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या एका महिलेने भर रस्त्यात संताप व्यक्त करत जोरदार हंगामा केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा:

मिचेल स्टार्कला हिरवा कंदील

भारत-जर्मनी संरक्षण सहकार्याला नवी चालना

“ही काय फलंदाजी?” पंतवर बांगरचे ताशेरे

गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपीकडे सापडले १५ लाखांचे ड्रग्स

मुंबई पोलिसांनी या मोर्चाला अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली होती. यामध्ये ध्वनी प्रदूषण, गर्दीवर नियंत्रण आणि वाहतुकीला अडथळा न होण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. “आयोजकांनी या अटींचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वरळी पोलीस आता या मोर्चाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. नियमांचे उल्लंघन नेमके कुणी केले आणि याला जबाबदार कोण आहे, याचा शोध फुटेजच्या आधारे घेतला जात आहे. तपासाअंती संबंधितांवर अधिक कडक कलमे लावली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Exit mobile version