आसाम विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या चार दिवस आधी राजकीय वातावरण तापले. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्यावर विदेशी पासपोर्ट बाळगल्याचा आरोप केला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत खेडा यांनी दावा केला की रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे यूएई, इजिप्त आणि अँटिगुआ-बारबुडा यांचे पासपोर्ट आहेत आणि त्यांनी त्यासंदर्भातील कथित कागदपत्रेही सादर केली.
दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळत त्यांना द्वेषपूर्ण, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. त्यांनी खेडा यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी मानहानीचे खटले दाखल करण्याचाही इशारा दिला. विवाद अधिक तीव्र झाला, जेव्हा काँग्रेसने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. पक्षाने एक कथित यूएई गोल्डन व्हिसा कार्ड दाखवले, ज्यावर “रिनिकी भुयेएमियन सरमा” असे चुकीचे नाव लिहिलेले होते, जे संशयास्पद होते. तपासात असेही समोर आले की त्या कागदपत्रातील आयडी क्रमांक जन्मवर्षाशी जुळत नव्हता आणि मशीन-रीडेबल झोनमध्ये राष्ट्रीयताही चुकीची नोंदवली होती.
यानंतर या प्रकरणात मोठा खुलासा झाला. काँग्रेसने दाखवलेले कागदपत्र प्रत्यक्षात एका पाकिस्तानी नागरिकाच्या हरवलेल्या एमिरेट्स आयडी कार्डच्या फोटोवर छेडछाड करून तयार करण्यात आले होते. “Pakistani in Ajman” या फेसबुक ग्रुपमध्ये २८ मार्च रोजी टिपू सुलतान नावाच्या व्यक्तीने त्याचे हरवलेले कागदपत्र शेअर केले होते, ज्यात एमिरेट्स आयडीचा फोटोही होता. या आयडी कार्डचा क्रमांक 784-1996-5557498-8 आहे—हा तोच क्रमांक आहे जो काँग्रेस नेत्याने रिनिकी भुयान सरमा यांच्या कथित यूएई पासपोर्ट म्हणून दाखवला होता. मूळ कागदपत्रात जन्मतारीख १० जुलै १९९६ अशी नोंद आहे, जी आयडी क्रमांकातील दुसऱ्या भागाशी जुळते.
तुलनात्मक विश्लेषणात असे दिसून आले की मूळ कागदपत्रातील “अशरफ अब्देलकादर अब्देलसमद हुसेन” हे नाव बदलून “रिनिकी भुयान सरमा” करण्यात आले होते. तसेच जन्मतारीख, जारी आणि समाप्तीच्या तारखाही बदलण्यात आल्या होत्या. मात्र आयडी क्रमांक तसाच ठेवण्यात आल्यामुळे ही बनावटगिरी उघडकीस आली. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीयता “इजिप्त” अशीच ठेवण्यात आली होती.
भाजपा नेते आणि आसामचे मंत्री पीयूष हजारिका यांनी यावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “म्हणजे पवन खेडा यांनी या फेसबुक ग्रुपमधून गोल्डन कार्डचा नंबर उचलला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे!” तज्ज्ञांच्या मते, यूएईमधील एमिरेट्स आयडी हा १५ अंकी युनिक क्रमांक असतो, जो व्यक्तीच्या बायोमेट्रिक नोंदींशी जोडलेला असतो आणि तो कधीही बदलत नाही. वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये एकाच क्रमांकाचा वापर होणे शक्य नसते, त्यामुळे हे कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होते.
हे ही वाचा:
“धुरंधरमध्ये स्फोट लियारीत, पण धूर वांद्रे-जुहूत”
“कराराची मंगळवारची मुदत चुकल्यास सर्व उध्वस्त करणार!”
इसिस संघटनेशी संबंधित दोन संशयिताना ठाणे, कुर्ल्यातून अटक
कर्णधार दमदार; लखनऊ सुपर जायंट्सचा हैदराबादवर मोठा विजय
मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा म्हणाले, “मी त्यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळतो. हे चुकीच्या हेतूने तयार केलेले, बनावट आणि राजकीय प्रेरित खोटे आहेत, ज्यांचा उद्देश आसामच्या लोकांना दिशाभूल करणे हा आहे.” त्यांनी इशारा दिला की न्यायालयात सत्य समोर आल्यानंतर दोषींना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तर रिनिकी भुयान सरमा यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याकडून किमान पडताळणीची अपेक्षा होती, बनावट पासपोर्टच्या काल्पनिक प्रतिमा पसरवण्याची नव्हे. त्या म्हणाल्या, “आता मी कायद्याला त्याचे काम करू देईन. फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत आणि आम्ही हे प्रकरण न्यायालयात पुढे नेऊ.”
