काँग्रेस बॅकफूटवर; विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठींबा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस बॅकफूटवर; विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठींबा

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीत कॉंग्रेस विरुद्ध ठाकरे गट असे मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरुवातीला विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता काँग्रेसने बॅकफूटवर जात आपली भूमिका बदलत विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडत अंबादास दानवेंना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसची मनधरणी करण्यात अखेर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला यश आले असल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. तसेच काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार देण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हे ही वाचा:

बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधान परिषद उमेदवारीचीही घोषणा

प. बंगालमधून ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या ७७ तक्रारी दाखल

अमेरिका इराण युद्धामुळे पाकिस्तानला आले तेलाचे मोठे बिल

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपची भूमिका ही संविधान विरोधी भूमिका आहे. ⁠फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपची भूमिका आहे. यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. ⁠राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवले. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशी सर्वांची भूमिका होती. मात्र, मी परत विधान परिषदेवर जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सोनिया गांधी यांनी जसे पंतप्रधान होणार नाही, अशी भूमिका घेतली. तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. यात ⁠कोणाचा अनादर नाही. ⁠त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून आम्ही मानतो, असे त्यांनी म्हटले. आता आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version