मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर उर्वरित टप्प्याच्या निवडणुकाही आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकपूर्व वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे .ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येऊन लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाचं कॉंग्रेसने मात्र उद्धव ठाकरेंना डच्चू दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट एकत्र येणार असल्याचे दिसून येत असून काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवल्याचे याआधी समोर आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे त्यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जगातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबईची आहे. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे कोणाला किती जागा? हा प्रश्न निर्माण होत नाही. हायकमांडशी चर्चा करुन स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे. मतांचं विभाजन होईल असं मला वाटत नाही. आम्ही मुंबईत लढत आलो आहोत. आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत आहेत. त्यांचे विभाजन होत नाही. मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य!

गुजरातनंतर फरिदाबादेत ३०० किलो आरडीएक्ससह डॉक्टर सापडला

चीनमध्ये डॉक्टर झालेला कट्टर इस्लामी भारतीयांवर करणार होता विषप्रयोग

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; भाजपाची सिद्धरामय्या सरकारवर टीका

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. तसेच समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे उद्देश आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची पत्रकार परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी लवकरच महागठबंधन होणार आहे. येत्या निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार आहोत, अशी घोषणा नाशिकच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबईत एकला चलो चा नारा दिला असला तरी नाशिकमध्ये सध्या मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version