देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यासोबतच राज्यातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पाचही विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा ७ मे रोजी, तामिळनाडू १० मे रोजी, आसाम २० मे रोजी, केरळ २३ मे रोजी आणि पुद्दुचेरी १५ जून २०२६ रोजी संपेल. तसेच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच, या सर्व राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे, २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि या सर्व राज्यांचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील.
देशाच्या पाच राज्यातील मतदारांची संख्या एकूण १७.४ कोटी एवढी आहे, तर एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या २.१९ लाख असून एकूण २५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली. याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि देखरेख मजबूत करण्यासाठी आयोग सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग सुविधा प्रदान करेल.
हे ही वाचा:
तीन राज्यांमध्ये स्फोट घडवण्याचा कट उधळला; आरडीएक्स, आयईडीसह तिघांना अटक
आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या
UAE निर्बंधांचा परिणाम; दुबई मार्गावरील अनेक उड्डाणे रद्द
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बेल्जियमच्या दौऱ्यावर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “कोणत्याही लोकशाहीचा पाया पारदर्शक मतदार यादी आहे. या उद्देशाने, कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होऊ नये यासाठी संविधानाच्या कलम ३२६ अंतर्गत एक विशेष सखोल पुनर्रचना केली जात आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी मी सर्व बूथ लेव्हल अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि इतर सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो.”
