पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ११ मार्च रोजी देशवासियांना आश्वासन दिले की, सरकार आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सर्वतोपरी मदत करत आहे. यासोबतच त्यांनी युद्धाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. केरळमध्ये निवडणुकीच्या तोंडावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस प्रक्षोभक आणि बेजबाबदार विधाने करत असून यामुळे परदेशात असलेल्या भारतीयांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. आखाती देशांमधील भारताचे मिशन आणि दूतावास नागरिकांना चोवीस तास मदत करत आहेत, तसेच या प्रदेशातील मैत्रीपूर्ण सरकारे भारतीयांची काळजी घेत आहेत.
“आखाती प्रदेशातील परिस्थिती पाहता, चिंता स्वाभाविक आहे. आमचे लाखो बंधू आणि भगिनी तिथे काम करतात. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की भाजप- एनडीए सरकार सत्तेत आहे. जेव्हा जेव्हा आमचे नागरिक दुसऱ्या देशात अडकतात तेव्हा आम्ही त्यांना मदत करण्यासाठी आमची सर्व शक्ती वापरतो. आजचा भारत संकटाच्या वेळी आपल्या नागरिकांना एकटे सोडत नाही. आजही, या संघर्षात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितता आणि सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस पक्ष इतक्या मोठ्या जागतिक संकटात राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस जाणूनबुजून परिस्थिती बिघडवण्यासाठी आणि तेथील आपल्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी प्रक्षोभक आणि बेजबाबदार विधाने करत आहे. या संकटाच्या काळात काँग्रेस राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे हे मोठे दुर्दैव आहे. पुढे त्यांनी आरोप केला की, पक्ष जाणूनबुजून तणाव वाढवण्यासाठी विधाने करत आहे जेणेकरून भारतीय या परिस्थितीत अडकून राहतील आणि त्यांच्याविरुद्ध राजकीय मोहिमा सुरू करता येतील. मग हे लोक मोदींना शिवीगाळ करणारे रील बनवण्याची मोहीम सुरू करू शकतील, अशी सणसणीत टीका नरेंद्र मोदींनी केली.
आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आणि मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी देण्यासाठी पेट्रोलियम क्षेत्राचा विस्तार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोची रिफायनरी येथे पॉलीप्रोपायलीन युनिटची पायाभरणीही याच उद्देशाने करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. “आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आपल्याला पुन्हा एकदा स्वावलंबनाचे महत्त्व शिकवले आहे. कोविड संकट, युक्रेन संकटादरम्यान स्वावलंबी राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपण पाहिले आहे आणि सध्याच्या संकटाने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
“सरकारी पक्षाचा खटला ठोस, ग्राह्य पुराव्यांवर आधारित नाही!”
मायक्रोसॉफ्ट एनथ्रोपिकच्या मदतीला; ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला
“मोजतबाला सर्वोच्च नेता बनवू नका!” अली खामेनी यांच्या मृत्युपत्रात काय लिहिले आहे?
होर्मुझ सामुद्रधुनीत किती भारतीय जहाजं अडकली?
आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याबद्दल भारताचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. केंद्राच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या प्रयत्नांमुळे केरळला मोठा फायदा होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
