महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या राज्यात सुरू असताना मुंबई महानगर पालिकेवर जास्त चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर त्यांच्याकडून मराठी लोकांना भावनिक आवाहन करण्यात येत असून मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याच्या आशयाचे पोस्टर्स लावले जात आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीतून ठाकरे बंधूंच्या आवाहनावर खोचक सवाल विचारात टीका केली आहे.
“मराठी माणसाचे अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर, कोण संपवू शकणार आहे. ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची नसून ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. २५ वर्षे तुम्ही राज्य केलत तेव्हा मराठी माणूस कुठे होता? तेव्हा त्याला का वाचवले नाही. दक्षिण मुंबईतला माणूस वसई- विरारच्या पलीकडे का गेला? गिरणी कामगारांसाठी केवळ मोर्चे काढत राहिलात, पण घरे दिलीत नाहीत. बीडीडी चाळ, पत्राचाळीतील लोकांना रस्त्यावर का आणले? म्हणूनच ही लढाई मराठी माणसासाठी नाही तो मजबूत आहे. मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राचीच आहे. सूर्य- चंद्र असेपर्यंत हेच सत्य आहे. स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी हे पोस्टर्स आहेत,” अशी तिखट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर टीका करताना भ्रष्टाचारावरही भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले. २०० रस्त्यांच्या ऑडिटमध्ये रस्ते बनवताना आवश्यक असलेले PQC (Pavement Quality Concrete) आढळलेच नाही. कागदावर रस्ते झाले, पण प्रत्यक्षात दर्जा शून्य होता. कचरा उचलण्यासाठी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी चक्क रिक्षा आणि स्कूटरचे नंबर वापरून ट्रान्सपोर्टेशनचे पैसे लाटले गेले. ट्रकच्या जागी दुचाकींचे नंबर देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोविड काळात डॉक्टर आणि नर्स नसताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी सेंटर्स उभारली गेली. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. अगदी प्रेत वाहून नेणाऱ्या बॉडी बॅग मध्येही या लोकांनी घोटाळा केला.
हेही वाचा..
डोनाल्ड ट्रम्प बनले व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? नेमकं प्रकरण काय?
साबरमती काठी मोदींसह जर्मन चान्सलर मर्झ यांनी उडवले पतंग
इराणी राजवटीविरुद्धच्या निदर्शनांदरम्यान ट्रक घुसला; अनेक जण जखमी
जम्मू काश्मीरच्या सांबा, राजौरी, पूंछ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन
“धारावीचं रिडेव्हल्पमेंट १९८४ साली राजीव गांधींनी सांगितलं होतं. त्यावर २०१४ पर्यंत काही झालं नाही. २०१४ साली टेंडर दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं. एलओआय केला होता. मधल्या काळात ठाकरे सरकार आले. उद्धव ठाकरेंनी एलओआय रद्द केला आणि नव्याने टेंडर केला. चार लोकं पुढे आले आणि त्यात अदानीला टेंडर मिळालं. म्हणजे अदानीकरण त्यांनीच केलं. पूर्वी ज्यांना टेंडर दिलं होतं. ते ही अनुभवी होते, आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. ते टेंडर रद्द केलं नसतं तर अदानी आलीच नसती,” असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
