महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी “ऑपरेशन सिंदूर” बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात कॉंग्रेस पक्षावर टीका केली जात आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्या विधानापासून मागे हटण्यास नकार दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, “मी माफी मागणार नाही. मी काहीही चुकीचे बोललो नाही आणि माफी मागण्याची गरज नाही.” यानंतर आता भाजपाकडून चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की, मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा “पराभव” झाला. त्यांनी असा दावा केला की पाकिस्तानी सैन्याने पहिल्याच दिवशी भारतीय लष्करी विमान पाडली आणि त्यामुळे भारतीय हवाई दल पूर्णपणे ग्राउंडेड झाले. यानंतरही त्यांनी म्हटले की, “मला आणखी काही बोलायचे नाही. पण मी माफी मागणार नाही. त्याची गरज नाही.”
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर, भाजपने काँग्रेसला लक्ष्य करत भाजप नेत्यांनी याला “राष्ट्रविरोधी” म्हटले आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, “सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेस पक्षाचे वैशिष्ट्य बनले आहे. हे केवळ चव्हाण यांचे विधान नाही; ते राहुल गांधींच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच पक्ष अशा नेत्यांवर कारवाई करत नाही.” केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, सैन्याच्या शौर्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे करणारे कधीही राष्ट्रीय हिताचा विचार करू शकत नाहीत. तर, खासदार आणि माजी डीजीपी ब्रिज लाल म्हणाले, काँग्रेस नेहमीच पाकिस्तान समर्थक राहिली आहे. जेव्हा राहुल गांधी परदेशात जातात तेव्हा ते भारताचा अपमान करतात.
हे ही वाचा :
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच शूटर्सना अटक
पंतप्रधान मोदी इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित!
१.५ कोटींच्या फसवणूकीचा कट उधळला; बँक अधिकाऱ्यांनी दाखवली सतर्कता
अमेरिकेकडून आणखी २० देशांवर प्रवास बंदी! कोणत्या देशांचा समावेश?
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई केली. त्यावेळी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी ऑक्टोबरमध्ये स्पष्ट केले की पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, जी भारताने हाणून पाडली. पाकिस्तानने भारतीय राफेल विमान पाडल्याचा दावा केला होता, परंतु एअर चीफ मार्शल यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले.
