महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक काळात काँग्रेसने या योजनेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून महिलांच्या हिताच्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणूक काळातील घोषणा नसून, ती आधीपासूनच लागू असलेली आणि पूर्णपणे कायदेशीर चौकटीत राबवली जाणारी सामाजिक योजना आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सुरू असलेल्या ऑन गोईंग योजनांवर बंदी येत नाही. त्यामुळे काँग्रेसकडून करण्यात येणारे आरोप हे दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“काँग्रेस कितीही पत्रं लिहो किंवा तक्रारी करो, महिलांचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले.
हे ही वाचा:
मैथिली ठाकूर यांचा मुंबईत रोड शो
एस. जयशंकर यांनी फ्रान्स व लक्झेंबर्ग दौऱ्यात कशावर भर दिला?
ईराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट सुरूच
ज्योतिरादित्य सिंधिया यांची जबरदस्त घोषणा
महायुती सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळत असून, घरगुती खर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळत आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्य देणारी ठरत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसकडून या योजनेवर ‘निवडणूक लाभासाठीचा उपक्रम’ असा आरोप केला जात असला, तरी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने महिलांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिल्याची टीका भाजपकडून होत आहे.
महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, महिलांचे सक्षमीकरण हे त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता लाडकी बहीण योजना अखंड सुरूच राहील आणि भविष्यात तिचा विस्तारही करण्यात येईल, असा ठाम विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
