बोटावरील शाई पुसणे हा गुन्हा!

राज्य निवडणूक आयोगाने दिली ताकीद

बोटावरील शाई पुसणे हा गुन्हा!

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यावेळी मतदारांच्या बोटांवर पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला तोंड फुटले आहे. काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मार्कर पेन सहज पुसता येऊ शकतो, त्यामुळे दुहेरी मतदानाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप केला आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग यांनी तातडीने खुलासा केला आहे. आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मतदानानंतर बोटावर लावलेली शाई किंवा मार्कर पुसण्याचा प्रयत्न करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधित मतदारावर नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
हे ही वाचा:
मुंबईच्या मतदारांसाठी मराठी अस्मितेपेक्षा नागरी प्रश्न महत्त्वाचे

जॉर्जियाहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडले आणि…

एअर इंडिया अपघात: दिवंगत पायलट कॅप्टनच्या पुतण्याला चौकशीसाठी समन्स

योगाची आसनं – शरीर आणि मनासाठी वरदान

आयोगाने हेही ठामपणे सांगितले की, शाई पुसली तरी कोणालाही पुन्हा मतदान करता येणार नाही. कारण एकदा मतदाराने मतदान केले की, त्याची नोंद मतदान यंत्रणा आणि मतदार यादीत कायमस्वरूपी होते. त्यामुळे दुहेरी मतदानाची शक्यता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार, मार्कर पेनचा वापर ठराविक नियमांनुसारच केला जात आहे. मतदान झाल्यानंतर मतदाराच्या नखावर आणि नखाच्या वरच्या भागावर स्पष्टपणे शाई लावण्याच्या सूचना मतदान कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे शाई पूर्णपणे पुसणे शक्य नसल्याचा दावा आयोगाने केला आहे.

दरम्यान, या विषयामुळे काही ठिकाणी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी आयोगाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पारदर्शक, मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, कोणतीही तक्रार आढळल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version