पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि महत्त्वाच्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून पुरवठा खंडित होण्याच्या चर्चेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की, भारत ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत सक्षम आहे. पंतप्रधान म्हणाले की, देशाकडे ५३ लाख मेट्रिक टनांचा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा असून ४१ देशांशी आपले तेल आयातीचे जाळे तयार झालेले आहे. तसेच, हा साठा ६५ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे.
“गेल्या दशकात भारताने संकटकाळासाठी कच्च्या तेलाच्या साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. आज आपल्या देशाकडे ५३ लाख मेट्रिक टनांहून अधिक स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे आणि ते ६५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त करण्यासाठी काम सुरू आहे,” असे पंतप्रधानांनी लोकसभेत मध्ये सांगितले. लोकसभेत या सगळ्या विषयांवर मोदी बोलत होते.
अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना, मोदी म्हणाले की भारताने ऊर्जा आयातीचे स्रोत मोठ्या प्रमाणात विविध केले आहेत. “पूर्वी आपण २७ देशांकडून आयात करत होतो; आज आपण ४१ देशांकडून ऊर्जा आयात करतो,” असे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
‘धुरंधर २’ कडून चार दिवसांत ६०० कोटींचा टप्पा पार!
पाक सुपर लीगमधील विदेशी खेळाडू वाऱ्यावर
पाकिस्तान सुपर लीगला युद्धाचा फटका; स्पर्धा फक्त दोन शहरांपुरती मर्यादित
२० लाख अमेरिकन डॉलर्स मोजा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज घेऊन जा!
पंतप्रधानांनी देशांतर्गत तयारी मजबूत करण्यावर भर दिला. “आपली रिफायनिंग क्षमता देखील वाढली आहे, असे सांगतानाच गेल्या दशकात आपण कच्च्या तेलाच्या साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. आता आपल्याकडे मजबूत स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा आहे,” असे ते म्हणाले.
“तेल आणि वायूचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अनेक देशांशी सतत संपर्कात आहोत,” असेही त्यांनी सांगितले. तथापि, सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आणि बहुआयामी आव्हाने निर्माण झाल्याचे मोदी यांनी मान्य केले. “या युद्धामुळे आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि मानवीय अशी अनपेक्षित आव्हाने निर्माण झाली आहेत. भारताचे या संघर्षात सहभागी आणि प्रभावित देशांशी घनिष्ठ व्यापार संबंध आहेत. हा प्रदेश आपल्या जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग आहे आणि आपल्या कच्च्या तेल व वायू आयातीचा मोठा हिस्सा याच मार्गाने येतो,” असे ते म्हणाले.
त्यांनी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचाही निषेध केला. “व्यावसायिक जहाजांवरील हल्ले आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या मार्गांवरील अडथळे अस्वीकारार्ह आहेत. राजनैतिक प्रयत्नांद्वारे भारत या अस्थिर परिस्थितीतही आपल्या जहाजांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, “कच्चे तेल, वायू, खत आणि इतर अनेक ऊर्जा स्रोतांचा मोठा भाग हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे येतो आणि हा मार्ग बंद असतानाही आम्ही आमच्या गरजा पूर्ण करत आहोत. या अडथळ्यांनंतरही भारत आपली ऊर्जा गरज प्रभावीपणे पूर्ण करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “कच्चे तेल, वायू, खत आणि इतर आवश्यक आयातीचा मोठा हिस्सा या मार्गाने येतो. अडथळे असूनही आम्ही अखंड पुरवठा सुनिश्चित करत आहोत,” असे ते म्हणाले. त्यांनी घरगुती ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य असल्याचेही सांगितले, कारण भारत जवळपास ६० टक्के एलपीजी गरजा आयात करतो.
दरम्यान, इराणने प्रभावीपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. पर्शियन आखाताच्या या अरुंद प्रवेशद्वारातून जगातील सुमारे पाचव्या भागाइतका तेल आणि वायू पुरवठा होतो. तेहरानने हा मार्ग फक्त अमेरिका आणि तिच्या सहयोगींसाठी बंद असल्याचे म्हटले असले तरी, सुमारे २० जहाजांवर हल्ल्यांनंतर वाहतूक जवळपास शून्यावर आली आहे. तेलाच्या किमती १०० अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढल्या आहेत, ज्या पूर्वी ७५ डॉलर होत्या. तसेच इराणने इशारा दिला आहे की या किमती २०० डॉलरपर्यंत जाऊ शकतात.
