पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २०२६ मधील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. ‘मन की बात’च्या १३०व्या भागात पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया, उद्योग क्षेत्रातील गुणवत्ता आणि जन-सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भाष्य केले.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’च्या प्रवासाची आठवण करून देताना सांगितले की, सध्या सोशल मीडियावर अनेक जण २०१६ मधील आठवणी शेअर करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनीही देशवासीयांसोबत एक आठवण शेअर केली. सुमारे १० वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘स्टार्टअप इंडिया’ ही संकल्पना आज एक ऐतिहासिक चळवळ बनली आहे. या प्रवासाचे खरे नायक देशातील तरुण आहेत. त्यांनी आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडून नवकल्पना केल्या आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, असे पंतप्रधानांनी सांगितले.
हे ही वाचा:
घर सजावटीसाठी ‘मिनिमल व नॅचरल’ थीम
हार्बर मार्गावरील प्रवास होणार गारेगार
“बांगलादेशवर अन्याय; पाकिस्तानचा वर्ल्ड कप निर्णय सरकारकडे”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टम बनले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अवकाश (स्पेस), अणुऊर्जा, सेमीकंडक्टर, मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात भारतीय स्टार्टअप्स सक्रिय आहेत. कोणत्याही क्षेत्राचे नाव घेतले तरी तेथे एखादा भारतीय स्टार्टअप कार्यरत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप क्षेत्राशी जोडलेल्या तरुणांना आणि नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी सलाम केला आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी उद्योगजगत आणि स्टार्टअप्सना गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. अशा वेळी उद्योग आणि स्टार्टअप्सची जबाबदारी अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. ‘चलता आहे’ किंवा ‘हो जाईल’ असा दृष्टिकोन आता संपला असून प्रत्येक स्तरावर गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, देशात होणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता अधिक चांगली करण्याचा संकल्प आवश्यक आहे. वस्त्रोद्योग असो, तंत्रज्ञान असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा पॅकेजिंग—भारतीय उत्पादनांची ओळख ही टॉप क्वालिटीच असली पाहिजे. उद्योग आणि स्टार्टअप्सनी उत्कृष्टतेला आपला बेंचमार्क मानावे आणि प्रत्येक उत्पादनात गुणवत्तेला सर्वोच्च स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
