पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बांगलादेशसोबत आयसीसीकडून होत असलेल्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसी दुहेरी निकष लावत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, टी-२०वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तान सहभागी होणार की नाही, हा निर्णय पूर्णतः पाकिस्तान सरकार घेईल.
कोलकाता नाईट रायडर्सने मुस्ताफिझूर रहमानला मुक्त केल्यानंतर बांगलादेशने टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. सुरक्षेची गंभीर चिंता व्यक्त करत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पर्धेचे ठिकाण भारताऐवजी श्रीलंकेत हलवावे, अशी मागणी आयसीसीकडे केली होती.
मात्र, आयसीसीने विद्यमान वेळापत्रकात कोणताही बदल करण्यास नकार दिला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी खेळाडूंशी चर्चा करून बांगलादेशने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रकरण वाद निवारण समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती, पण तीही फेटाळण्यात आली.
यानंतर आयसीसीने २४ जानेवारी रोजी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला स्पर्धेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला.
‘डॉन’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मोहसिन नक्वी म्हणाले,
“बांगलादेशवर अन्याय झाला आहे. मी आयसीसीच्या बोर्ड बैठकीतही हेच सांगितले. एक देश मनमानी निर्णय घेऊ शकतो आणि दुसऱ्या देशासाठी मात्र उलट भूमिका घेतली जाते, हे दुहेरी निकष आहेत.
“म्हणूनच आमची भूमिका स्पष्ट आहे की बांगलादेशवर अन्याय झाला असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत वर्ल्ड कप खेळण्याची संधी दिली पाहिजे. ते आयसीसीचे प्रमुख सदस्य आहेत. त्यांच्यावर असा अन्याय होता कामा नये,” असे नक्वी म्हणाले.
पाकिस्तानही वर्ल्ड कपचा बहिष्कार करणार का?
यावेळी नक्वी यांना विचारण्यात आले की, बांगलादेशप्रमाणे पाकिस्तानही टी-२० वर्ल्ड कपचा बहिष्कार करणार का?
त्यावर उत्तर देताना नक्वी म्हणाले,
“वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याबाबत आमची भूमिका पाकिस्तान सरकार जे निर्देश देईल त्यानुसार असेल. पंतप्रधान सध्या पाकिस्तानमध्ये नाहीत. ते परत आल्यानंतर अंतिम निर्णय कळवता येईल. हा सरकारचा निर्णय आहे. आम्ही सरकारचे ऐकतो, आयसीसीचे नाही.”
पाकिस्तानने वर्ल्ड कप खेळला नाही तर ‘प्लॅन बी’ आहे का, असे विचारल्यावर नक्वी म्हणाले,
“आधी निर्णय होऊ द्या. आमच्याकडे प्लॅन A, B, C, D सगळे तयार आहेत.”
बांगलादेशलाही ‘हायब्रिड मॉडेल’चा पर्याय द्यावा : नक्वी
भारतामधील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तान ‘हायब्रिड मॉडेल’चा अवलंब करतो. पाकिस्तानचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत होतात. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्येही पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.
याच धर्तीवर बांगलादेशलाही सवलत द्यावी, अशी मागणी नक्वी यांनी केली.
“बांगलादेश हा पाकिस्तान आणि भारतासारखाच आयसीसीचा पूर्ण सदस्य आहे. पाकिस्तानसाठी आणि भारतासाठी जर हा पर्याय दिला गेला असेल, तर बांगलादेशसाठीही तोच न्याय केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
“एक देश दुसऱ्या देशावर अटी लादू शकत नाही. जर तसे करण्याचा प्रयत्न झाला, तर पाकिस्तानचीही स्वतःची ठाम भूमिका असेल,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर टीका केली.
दरम्यान, टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे. दोन्ही संघ ग्रुप A मध्ये आहेत.







