सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका – बावनकुळे

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका – बावनकुळे

सणासुदीच्या काळात लोकांना घराच्या पाडकामाबाबतच्या नोटीसा देऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार करु नका. जी कारवाई करायची असेल, ती गणेशोत्सवानंतरच करा. अधिकाऱ्यांनी लोकांना कोणत्याही नोटिसा देऊ नये, असे स्पष्ट आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तर नागरिकांनी केलेली बांधकामे अनधिकृत असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई गणेशोत्सवापर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बनावट नकाशे तयार करून बांधकामे केलेल्यांना अभय मिळणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीपक तावडे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, उत्तर मुंबईतील बांधकामबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ८८४ हद्द कायम नकाशांपैकी १६५ नकाशांमध्ये व नगर भूमापन अधिकारी गोरेगाव यांच्या अभिलेखातील नगर भूमापन चौकशीच्या वेळचे ९ आलेखात छेडछाड झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने अनधिकृत ठरलेली बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. चुकीचे नकाशे बनवून बांधकाम केलेल्यांना अभय मिळणार नाही. मात्र, २०११ पूर्वी ज्यांची बांधकामे आहेत त्यांना नियमानुसार काही सवलती देण्यात येतील. यासाठी गणेशोत्सवापर्यंत महापालिकेने पाडकाम करु नये. त्यानंतर महापालिका कार्यालयात सविस्तर बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version