२९ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यातील सुधारणांचे कारण पुढे करत हा बहिष्कार घालण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीही नागरिकत्व सुधारणा कायद्याचे निमित्त साधून विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता.
केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या शेतकरी सुधारणांचा विरोध करताना काँग्रेसच्या नेतृत्वात एकूण १६ विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार घालणार आहेत. यात महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त तृणमुल काँग्रेस, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक या महत्वाच्या पक्षांचा समावेश आहे. २६ जानेवारी रोजी दिल्लीत घडलेल्या हिंसाचारात केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका होती याचा तपास व्हावा अशी मागणीही या सोळा पक्षांतर्फे करण्यात आली आहे.
२९ जानेवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. २९ जानेवारी पासून सुरु होणार अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारी चालणार आहे, तर ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज चालणार आहे.
