पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू करण्याच्या पुढाकाराचे स्वागत केले. सोमवार, ८ डिसेंबर रोजी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाला यावर कोणताही आक्षेप नाही. सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी चर्चा सुरू केली आहे. चर्चेची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात हे गीत पहाडासारखे उभे राहिले आणि ब्रिटिशांच्या अत्याचाराला न जुमानता एकतेला प्रेरणा दिली.
“वंदे मातारमवरील चर्चा होऊ द्या, आम्हाला काहीही अडचण नाही,” असे ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर चर्चेचा संदर्भ देत माध्यमांशी बोलताना सांगितले. उत्तर बंगालच्या राज्य दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्या माध्यमांशी बोलत होत्या. वंदे मातरम हे गाणे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे आणि जदुनाथ भट्टाचार्य यांनी संगीतबद्ध केले आहे.
दरम्यान, ममता यांनी काही भाजप नेत्यांवर नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि राजा राम मोहन रॉय यांसारखे नेते आवडत नसल्याचा आरोप केला. ममता म्हणाल्या, “काही भाजप नेते म्हणत आहेत की त्यांना नेताजी आवडत नाहीत. तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, बंकिमचंद्र, विद्यासागर किंवा राजा राम मोहन रॉय आवडत नाहीत आणि तुम्ही त्यांचा सतत अपमान करता. बंगालचा इतिहास आणि योगदान नीट न जाणता त्यांनी राजकारणात कसा प्रवेश केला?
हेही वाचा..
“काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे- तुकडे केले!”
मध्य प्रदेश नक्षलमुक्त! १ कोटींचे बक्षीस असलेल्या मज्जीसह ११ कमांडरचे आत्मसमर्पण
हैदराबादच्या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव? भाजपकडून जोरदार टीका
मैत्रिणीला भेटायला पाकिस्तानात जाणाऱ्या आंध्रच्या तरुणाला अटक
वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारपासून संसदेत त्यावर चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेत, सभागृहाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतिहासाबद्दल बोलताना कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. “वंदे मातरमचा हा १५० वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यांतून गेला आहे. जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देशाला गुलामगिरीत जगण्यास भाग पाडले गेले. जेव्हा वंदे मातरमला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश आणीबाणीच्या साखळ्यांमध्ये जखडला गेला. कॉंग्रेसने या गीताचे तुकडे केले. मुस्लीम समुदाय चिथावेल म्हणून असे करण्यात आल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
