लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना, काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या भाषणाचा रोख सुरुवातीला वैयक्तिक बाबींवर होता आणि पुढे ही टीका देशावरील आरोपांवर पोहचली. यावेळी त्यांनी राजकारणाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्या भाषणात मार्शल आर्ट्सचा उल्लेख केला. या खेळातील “पकड” आणि “चॉप” हे राजकारणातील काही गोष्टींसारख्या काम करतात.
राहुल गांधी म्हणाले की, ते स्वतः मार्शल आर्ट्सचा सराव करतात. ज्युडोचे उदाहरण देत ते म्हणाले की या कलेचा पाया “ग्रिप” आहे. खेळाडू प्रथम एक पकड स्थापित करतो, नंतर पुढील चाल अंमलात आणण्यासाठी त्या पकडीचा वापर करतो. याचा संबंध राजकारणाशी जोडताना ते म्हणाले की, कधीकधी राजकारणात “पकड” असते, म्हणजे नियंत्रण, रणनीती पण ते सामान्य लोकांना दिसत नाही. राजकारण आणि व्यवसायात अनेक निर्णय अशीच रणनीती वापरून घेतले जातात, जिथे सुरुवातीची पकड नंतरच्या मोठ्या निर्णयांवर प्रभाव पाडते.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, हा करार समानतेच्या अटींवर स्वाक्षरी केलेला नाही. त्यांनी सरकारवर भारत मातेला विकल्याचाही गंभीर आरोप केला. भारत- अमेरिका करारात देशातील शेतकऱ्यांचे हित पायदळी तुडवण्यात आले आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. “अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा डेटा. जर अमेरिकेला महासत्ता राहायचे असेल आणि डॉलरचे रक्षण करायचे असेल तर भारताचा डेटा अमेरिकन लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. महासत्ता राहण्यासाठी अमेरिकेला भारतीय डेटाची आवश्यकता आहे. अमेरिका आणि चीन भारतीय नागरिकांच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत. जर अमेरिका महासत्ता राहायची असेल, तर भारतीय डेटा हाच मुख्य मुद्दा आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, जर विरोधी इंडी आघाडी सत्तेत असती आणि व्यापार करारावर वाटाघाटी करत असती, तर आम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सांगितले असते की भारतीय लोकांकडे तुमच्या डॉलरचे रक्षण करण्यासाठी सर्वात मोठे भांडवल आहे. तसेच आम्ही समान अटींवर बोललो असतो. आम्ही म्हटले असते, आम्ही तुमचे सेवक असल्यासारखे बोलू शकत नाही. आम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना असेही सांगितले असते की आम्ही आमच्या इंधनाचे रक्षण करणार आहोत. तसेच सांगितले असते की, तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचे रक्षण कराल, पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांचेही रक्षण करू.
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारने व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे; यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच, आमचे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेची आयात ४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. आमचे शुल्क ३ वरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे शुल्क १६ टक्क्यांवरून शून्य झाले आहे.
हे ही वाचा:
लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने चालवला चाकू
४४ वर्षानंतर मुंबईत भाजपाचा महापौर; रितू तावडेंनी महापौरपदाची स्वीकारली सूत्रे
जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक प्रकरणी पेंग्विन प्रकाशनाला नोटीस
भारत अमेरिका व्यापार करारात काही महत्त्वाचे बदल
पुढे राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने भारत विकला आहे. भारतमाता विकली आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मला माहित आहे की, पंतप्रधान सामान्य परिस्थितीत भारत विकणार नाहीत. त्यांनी भारत विकला, कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आपल्याला दिसते. राहुल गांधी म्हणाले, भारत- अमेरिका व्यापार करारामुळे ऊर्जा सुरक्षा धोक्यात आहे. आपण युद्धाच्या काळात जगत आहोत. गाझामध्ये, रशिया- युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. चीन अमेरिकेला आव्हान देत आहे. आता ऊर्जा आणि वित्त शस्त्रास्त्र बनले आहे.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले की युद्धाचा काळ संपला आहे, परंतु आपण युद्धाच्या युगात प्रवेश करत आहोत. देशाच्या अर्थसंकल्पात जगभरातील संघर्षांच्या परिणामांना तोंड देण्याबद्दल काहीही सांगितले नाही. अर्थसंकल्पात ऊर्जा आणि वित्त शस्त्रीकरणाबद्दल काहीही नाही.
