अदानींनी डोक्यावर बंदूक ठेवून विमानतळ घेतलेत!

ठाण्यातील सभेत राज ठाकरे पुन्हा अदानींवर घसरले

अदानींनी डोक्यावर बंदूक ठेवून विमानतळ घेतलेत!

आज ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत कालच्याच भाषणाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, अदानी माझ्याकडे आले होते त्याचे फोटो दाखवले जात आहेत. घरी आले होते तर काय करू हाकलून देऊ? नवी मुंबईचा विमानतळ सोडला तर अदानीने एकही विमानतळ बांधलेला नाही. जी विमानतळ घेतली आहेत ती डोक्यावर बंदूक ठेवून घेतली आहेत. गुजरातच्या मुंदरा बंदराचेही तसेच आहे. हे बंदर त्यांनी बांधले आहे पण बाकी बंदूक डोक्यावर ठेवून घेतली आहेत.

या निवडणुकीत भरपूर पैसे वाटले जात आहेत असा आरोप करत एका घरातील तीन उमेदवाराना १५ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. पण ती त्यांनी नाकारली. एका महिला उमेदवाराला ५ कोटींची ऑफर दिली होती. उमेदवारी मागे घेण्यासाठी कुणाला १ कोटी, कुणाला ५ तर कुणाला १० कोटी देण्याचे आश्वासन दिले आहे,  असे राज ठाकरे म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार शब्दांत टीका केली. मात्र, या टीकेपलीकडे जाऊन ठाणे शहराच्या विकासासाठी ठोस आराखडा, स्पष्ट धोरण किंवा ठाणेकरांच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना मांडण्यात ते अपयशी ठरल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

भाषणादरम्यान महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, या विषयांवर टीका करताना नेहमीप्रमाणे भावनिक मुद्द्यांवर अधिक भर देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे सत्तेबाहेर असताना पक्षाने जनतेसाठी नेमके काय योगदान दिले, याचे ठोस उत्तर देणे त्यांनी टाळल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

रजत भस्म : त्वचेला देईल नवी ऊर्जा

लाडकी बहीण योजनेला निवडणूक आयोगाचा दिलासा

जर्मनीमार्गे दुसऱ्या देशात आता बिनधास्त जा!

ब्रिटिश विद्यापीठांतील कट्टर मुस्लिम ब्रदरहूडमुळे अरब अमिरातीने शिष्यवृत्त्या रोखल्या

ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, अनियंत्रित वाढते बांधकाम, प्रदूषण तसेच नागरी सुविधांची दुरवस्था हे शहरासमोरील ज्वलंत प्रश्न आहेत. मात्र, या गंभीर समस्यांवर ठोस भूमिका किंवा ठरावीक उपाययोजना मांडण्याऐवजी भाषण अधिकाधिक आरोप-प्रत्यारोपांपुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे ही सभा विकासात्मक उपाययोजनांपेक्षा केवळ राजकीय टीकेचे व्यासपीठ ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

ठाणे हे औद्योगिक, व्यापारी आणि शहरी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अशा शहरासाठी मनसेकडे नेमकी काय दीर्घकालीन विकासदृष्टी आहे, भविष्यात सत्ता मिळाल्यास शहराचा काय चेहरा असेल, याबाबत कोणतीही ठोस स्पष्टता आजच्या सभेत दिसून आली नाही.

एकूणच, आजची सभा राज ठाकरे यांच्या जुन्याच आक्रमक राजकीय शैलीची पुनरावृत्ती ठरली. मोठे दावे आणि तीव्र टीका यापलीकडे जाऊन ठाणेकरांसाठी ठोस विकासाचा रोडमॅप मांडण्यात ही सभा अपयशी ठरल्याचे स्पष्ट चित्र समोर आले.

Exit mobile version