कल्याण- डोंबिवलीत मनसेची एकनाथ शिंदेंना साथ! भाजपाचे काय होणार?

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती

कल्याण- डोंबिवलीत मनसेची एकनाथ शिंदेंना साथ! भाजपाचे काय होणार?

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकींचे निकाल हाती आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी अनेक ठिकाणी खलबते पाहायला मिळत आहेत. एकीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी राज्यात हालचाली सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची असलेल्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंबंधी माहिती दिली.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असल्यास ६२ हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ५३ नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केला. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली. पुढे ते म्हणाले ठाकरे गटाच्या उर्वरित नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्यास हरकत नाही. आम्ही जो विकास करतोय ते पाहून कोणीही पाठिंबा देत असेल तर काय हरकत आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटले.

हे ही वाचा:

कर्तव्य मार्गावर रचणार इतिहास; काश्मिरी मुलगी करणार सीआरपीएफ पुरुष संघाचे नेतृत्व!

पाक संरक्षण मंत्र्यांकडून बनावट ‘पिझ्झा हट’चे उद्घाटन; खऱ्या कंपनीने पाठवली नोटीस

सनातन धर्मावर द्वेषपूर्ण टिप्पणी करणाऱ्या उदयनिधीचे कान उपटले!

डॉ. अशोक मोडक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभा

दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील राजकीय उटथापालथीनंतर आता मुंबईतही काही वेगळी खेळी होणार का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत युतीचाच महापौर बसेल. त्यात शिवसेनेचा महापौर बसला नाही तर कुणाला आवडणाल नाही. असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी राजकारणात काहीही घडू शकतं असे संकेत दिले. आता कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक काय करणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version