मुंबईतील शिवतीर्थावर आज झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भाषणांतून आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडला असला, तरी विकासाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका किंवा भविष्यातील आराखडा मांडण्यात आलेला दिसला नाही.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करताना विविध प्रकल्प, उद्योगसमूह आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु या आरोपांपलीकडे जाऊन मुंबईच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, रोजगारनिर्मिती किंवा मराठी युवकांच्या भवितव्यासाठी नेमकी काय दिशा असेल, याबाबत त्यांनी स्पष्ट मांडणी केली नाही.
हे ही वाचा:
वसई विरार मनपातील १३७ उमेदवाऱ्या संकटात?
महायुतीच्या काळात नाशिकमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक
सबरीमला सोन्याच्या चोरीवर अमित शहांचा हल्लाबोल
‘लाडकी बहीण योजना’ अखंड सुरूच राहणार
उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करताना लोकशाही, संविधान आणि राज्यातील राजकीय स्थिती यावर भर दिला. त्यांनी भाजपवर सत्ता केंद्रीकरणाचा आरोप केला आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे सांगितले. मात्र राज्यातील विकासकामे, उद्योग, गुंतवणूक, शेती किंवा शहर-विकास यासंदर्भात ठोस उपाययोजना किंवा धोरणात्मक दृष्टीकोन त्यांच्या भाषणातून पुढे आला नाही.
या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि राजकीय जोश यामुळे शिवतीर्थ परिसर गजबजलेला दिसत होता. आरोपांची धार तीव्र असली तरी विकासावर दोघेही नेते मौन का राहिले, हा प्रश्न. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची मानली जात असली, तरी मतदारांच्या दृष्टीने केवळ टीका नव्हे तर विकासाची स्पष्ट दिशा अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
