“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरी यांनी व्यक्त केली नाराजी

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

मनसेचे आक्रमक नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागची खदखद व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर टीका केली.

संतोष धुरी म्हणाले की, मनसेच्या स्थापनेपासून आम्ही राज ठाकरेंसोबत होतो. ज्यांच्यामुळे पक्ष फुटला त्यांनाच राज ठाकरेंनी सोबत घेतलं. या चर्चांवेळी संदीप देशपांडे यांना सहभागी करून घेतलं नाही. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठीही दिसले नाही पाहिजेत, असं वांद्रेच्या बंगल्यावरुन सांगण्यात आलं होतं, असा दावा संतोष धुरींनी केला. तसेच याबद्दल समजल्यानंतर आपण संदीप देशपांडेंना सांगितल्याचे ते म्हणाले. त्यावेळी तू तुझा विचार कर, मी काही येत नाही, असं संदीप देशापांडे म्हणाल्याची माहिती संतोष धुरींनी दिली. तसेच संदीप देशपांडेंचं मन मोठं आहे, असं संतोष धुरी म्हणाले.

“२००७ मध्ये आम्ही राज ठाकरेंसोबत बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेत होतो, नंतर मनसेत आलो आणि कार्य चालू ठेवलं. आमचं रक्त भगवं आहे. पण आता ज्या पद्धतीने युती झाली आहे, ज्या लोकांनी हिरव्या लोकांशी युती केली, त्यामुळे त्यांच्यातील लोक तुटून गेली. त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला. पण अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं. त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला आहे. आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे,” असा आरोप संतोष धुरी यांनी केला.

मुंबईत मनसेला ५२ जागा सोडल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ जागा निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, असे संतोष धुरी यांनी म्हटले.

हे ही वाचा..

‘वीबी जीरामजी’ योजनेमुळे खुश झाले मजूर

शास्त्रीय भाषांच्या संवर्धन, प्रसारासाठी ५४ दुर्मिळ प्रकाशने

जेएनयूचे नाव बदलून ‘आझाद भगतसिंग विद्यापीठ’ करा

नेहरू कॉलनीत दोन कुटुंबांमध्ये तुफान दगडफेक

संतोष धुरी हे राज ठाकरेंच्या मनसेचे माजी नगरसेवक होते. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रीय होते. मागील मनपा निवडणुकीत ते मनसेकडून निवडणूक लढले होते. परंतु त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी ठाकरे बंधू युती होत आहे. त्यात वार्ड क्रमांक १९४ मधून संतोष धुरी निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र जागावाटपात ही जागा ठाकरे गटाकडे गेली आणि संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा होती.

Exit mobile version