दादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार भावूक!

तुमच्या आठवणी माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहतील

दादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार भावूक!

दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावना वाचून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वाढदिवस साजरा करण्याच्या आनंदापासून जयंतीच्या वेदनेपर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडला आहे.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक वर्षे दादांचा जन्मदिवस घरात आनंद, उत्साह आणि अभिमानाने साजरा केला जात होता. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांच्या शुभेच्छांनी घर भरून जायचे. मात्र, आज त्याच दिवसाला ‘जयंती’ म्हणून स्मरण करावे लागत असल्याची वेदना असह्य असल्याचे त्यांनी नमूद केले. हे कटू सत्य स्वीकारायला माझे मन आजही तयार होत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दादा हे केवळ कुटुंबप्रमुख नव्हते, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे साथ देणारे व्यक्तिमत्त्व होते, असेही त्यांनी म्हटले आहे. कठीण प्रसंगी पाठीवर पडणारी त्यांची विश्वासाची थाप, योग्य मार्ग दाखवणारे मार्गदर्शन आणि प्रत्येक संकटात दिलेला मानसिक आधार आजही सतत जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. आज हे सगळे अचानक हरवून गेले आहे, सगळेच पोरके झाल्यासारखे वाटते. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली.

पोस्टच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी दादांच्या विचारांचा, लोकांप्रती असलेल्या सेवाभावाचा, शिस्तप्रिय स्वभावाचा आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाचा विशेष उल्लेख केला. तुम्ही आज शारीरिकदृष्ट्या माझ्यासोबत नसला, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी आणि तुमचे संस्कार माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कणाकणात कायम जिवंत राहतील, असे त्या म्हणाल्या. तसेच आपल्या आयुष्याच्या साथीदाराला आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण व आदरपूर्वक प्रणाम अर्पण करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत दिवंगत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेली विरहाची वेदना, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना अनेकांच्या मनाला भिडली असून, सोशल मीडियावर या पोस्टवर शोकसंवेदना आणि श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.

 

Exit mobile version