दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या क्रूर लाठीचार्जनंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात संताप पसरला असतानाच, दिल्लीत एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. आज सकाळी (२२ जुलै), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनपेक्षितपणे भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
PHOTO | NCP (SP) chief Sharad Pawar and party MP Supriya Sule meet PM Modi.
(Source: Third Party) pic.twitter.com/JnrnE4Wv8N
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2026
ही भेट संसदेतील मोदींच्या दालनात झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांचा हात धरून त्यांचे स्वागत केले. दोघांच्या हसण्या-खेळण्याचे आणि मनमोकळ्या संभाषणाचे फोटोही समोर आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असावी, असे सांगितले. त्यापलीकडे कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील शेती आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर पत्रही दिले. या पत्रामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, चौकशी प्रक्रियेला गती द्यावी आणि शेतकऱ्यांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सिंचन आणि पाणी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तृतीय पक्षामार्फत लेखापरीक्षण करावे, रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावेत आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमत केवळ जाहीर न करता प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा कायदेशीर अधिकार मिळावा, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. तसेच पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, बनावट आणि निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी तसेच दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणीही शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या भेटीमुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचा निर्लज्ज राजकीय वापर!
मोतीबिंदू आता वृद्धांपुरता मर्यादित नाही!
कोक्रॉच समर्थकांची पोलिसांवर दगडफेक, आरएएफ जवानालाही मारहाण
रोहित-कोहलीच्या भवितव्यावर युवराजची फटकेबाजी!
विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांनी काल जंतर मंतरला भेट दिली होती. यावेळी शरद पवार यांनी अभिजीत दीपक यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला होता.
