भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेत, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने या दोन्ही दिग्गजांच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
लॉर्ड्स येथे भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडेदरम्यान जिओस्टारशी बोलताना युवराज म्हणाला की, एखाद्या खेळाडूला पुढील योजनांमध्ये स्थान आहे की नाही, याबाबत स्पष्टपणे सांगितले जाणे अत्यंत आवश्यक आहे. खेळाडूंना अनिश्चिततेत ठेवणे योग्य नसल्याचेही त्याने नमूद केले.
युवराजने आपल्या कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना स्वतःलाही अशीच परिस्थिती अनुभवावी लागली होती. मुख्य प्रशिक्षक, कर्णधार किंवा निवड समिती… निर्णय कोणाचाही असो, पण खेळाडूला तो स्पष्टपणे सांगितला गेला पाहिजे. सत्य कदाचित कडू असेल, पण समोरासमोर सांगितल्याने खेळाडूला समाधान मिळते, असे तो म्हणाला.
२०२७ च्या विश्वचषकासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात ठेवायचे असल्यास, त्यांना व्यवस्थापनाने पूर्ण पाठिंबा द्यावा, असेही युवराजने स्पष्ट केले. जर तुम्हाला वाटत असेल की ते विश्वचषक खेळू शकतात, तर त्यांच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवा आणि निर्धास्तपणे खेळायला सांगा. एका मालिकेतील अपयशामुळे त्यांच्यावर दबाव आणू नका, असा सल्लाही त्याने दिला.
दरम्यान, लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने १२८ धावांची दमदार खेळी केली. त्याने १७ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. मात्र, त्याच्या शतकानंतरही भारताला २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.







