अर्थखाते फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवार पाहणार उत्पादन शुल्क, क्रीडा

सरकारमध्ये स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न

अर्थखाते फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवार पाहणार उत्पादन शुल्क, क्रीडा

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर विभागवाटप स्पष्ट झाले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मात्र, राज्याच्या कारभारात अत्यंत निर्णायक मानले जाणारे अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच सादर करणार, हे स्पष्ट झाले आहे.

मंत्रिमंडळातील विभागवाटपानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्यांक विकास व औकाफ ही तीन खाती सोपवण्यात आली आहेत. हीच खाती याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या अखत्यारीत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व कायम ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
हे ही वाचा:
इराणमधील बंदर अब्बास पोर्ट येथे जोरदार स्फोट

संतापजनक प्रकार- मालवणीतील नशामुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलींवर नराधमांचा अत्याचार

भारतीय विद्यार्थी आता अमेरिकेऐवजी युरोपकडे

दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य

दरम्यान, अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्रीपदासोबतच ठेवण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याची आर्थिक दिशा, विकासकामांसाठीचा निधी, तसेच विविध योजनांचे प्राधान्यक्रम हे या खात्याच्या माध्यमातून निश्चित केले जातात. त्यामुळे हे खाते मुख्यमंत्री फडणवीसांकडे राहिल्याने राज्याची आर्थिक धोरणे थेट त्यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा पहिलाच मोठा प्रशासकीय टप्पा ठरणार आहे. क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास या विभागांच्या माध्यमातून सामाजिक तसेच तरुणांशी संबंधित धोरणांवर आपला ठसा उमटवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

एकूणच, या विभागवाटपातून सत्तेतील संतुलन राखत सरकारमध्ये स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Exit mobile version